कुडाळ, पुढारी वुत्तसेवा : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असताना जालना येथे मराठा समाज आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज लांच्छनास्पद आहे. या अमानुष लाठीचार्जला जबाबदार असलेल्या महायुती सरकारचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत. हा अमानुष लाठीचार्ज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आदेशाने झाला आहे. या प्रश्नी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा समाज जी भुमिका घेईल त्या भुमिकेला सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा पुर्णतः पाठिंबा राहणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत सामंत यांनी दिली. (Maratha Reservation Protest)
अमित सामंत यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात असे म्हटले आहे की, जालना अंतरवाली सराटी येथे मराठा समाजामार्फत मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले होते, असे असताना त्या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचेच असताना आंदोलकांवर सरकार पुरस्कृत केलेला अमानुष आणि निंदनीय लाठीचार्ज हल्ला लांच्छनास्पद आहे. या निंदनीय घटनेला जबाबदार असलेले महायुती सरकार आणि गृहमंत्री यांचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर निषेध करत असून हा हल्ला पूर्व नियोजित आहे. मराठा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याच्या दडपशाही प्रवृत्तीचा केविलवाणा प्रयत्न महायुती सरकार करून मराठा आरक्षण दडपण्याचा प्रकार करत आहे. यांची किंमत भाजपला भविष्यात चुकती करावीच लागेल.
आगामी निवडणुकीत होणाऱ्या पराभवाची चाहूल लागल्याने भाजपच्या पाया खालची वाळू सरकत आहे. त्यामुळे जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगल घडवून आगामी निवडणुकीत त्याचा लाभ उठविण्यासाठीच भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, पण सकल मराठा समाज भाजपचा हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहाणार नाही. सकल मराठा समाज आंदोलकांवर बेछूट झालेला लाठीचार्ज हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसारच झाला आहे. अशा अत्याचारी भाजप महायुती सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) निषेध करत असून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मराठा समाजाच्या पूर्णपणे पाठीशी राहणार आहे असे अमित सामंत यांनी जाहीर केले आहे.
हेही वाचा