रत्नागिरी: देवरूख येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका | पुढारी

रत्नागिरी: देवरूख येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

साडवली:  पुढारी वृत्तसेवा: संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरातील सोळजाई मंदिराजवळ क्रांतीनगर येथे राहणाऱ्या मंगेश रघुनाथ शेट्ये यांच्या मालकीच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले. देवरूख शहरासारख्या भरवस्तीतील विहिरीत बिबट्या पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या बिबट्याला देवरूख वनविभागाने पिंजऱ्याच्या सहाय्याने सुरक्षितरित्या विहिरीबाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.

याबाबत देवरूख वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवरूख शहराची ग्रामदेवता सोळजाई मंदिराजवळ राहणारे मंगेश शेट्ये यांनी शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास विहिरीची मोटर सुरू केली. मात्र, पाणी येत नसल्याने त्यांनी मुलीला मोटारीने पाणी येत नसल्याचे सांगून विहिरीकडे जाण्यास सांगितले. मुलगीने विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीच्या पाण्यात बिबट्या तरंगताना दिसला. ही बाब तिने आपल्या वडिलांना सांगितली.

देवरूखातील मंगेश शेट्ये यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची बातमी देवरूख शहरात वाऱ्यासारखी पसरताच बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी शेट्ये यांच्या विहिरीकडे धाव घेतली. यावेळी नागरिकांची बिबट्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. दुसरीकडे बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती देवरूख वनविभागाला देण्यात आल्यानंतर विभागीय वनाधिकारी दिपक खाडे, रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार व देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सहयोग कराडे, राजाराम पाटील, आकाश कडूकर, सुरज तेली, रणजित पाटील, अरूण माळी यांनी पिंजरासहीत घटनास्थळी धाव घेत पिंजऱ्याच्या सहाय्याने बिबट्याला सुखरूपपणे विहिरीबाहेर काढले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देवरूखचे पोलीस विनोद चव्हाण व पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला तपासणीसाठी देवरूख येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याची तपासणी करून बिबट्या सुरक्षित असल्याचे वनविभागाला सांगितले. यानंतर या बिबट्याला वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले. दरम्यान, हा बिबट्या नर जातीचा असून तो दोन ते अडीच वर्षाचा होता. भक्षाचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button