

ज्येष्ठ वकील माजी खासदार आणि रत्नागिरीच्या समाजजीवनातील आधारवड ॲड. बापूसाहेब परुळेकर यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. (Bapusaheb Parulekar Obituary)
१९८० च्या दरम्यान भाजप पक्षाच्या संघटनेच्या बांधणीची धामधूम सुरु होती. खासदार बापूसाहेब परुळेकरांना आग्रह करूनही ते भाजपामध्ये आले नाहीत. खासदार म्हणून जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आल्यानंतर खासदारकी न सोडता पक्षबदल करणे त्यांच्या तत्त्वप्रणालीमध्ये बसत नव्हते. बापू भाजपामध्ये आले असते तर १९९५ मध्ये स्वाभाविकपणे अटलजींच्या सरकारमध्ये केंद्रात मंत्री झाले असते.
वकिलीचा वारसा बापूंनी मोठा कसोशीने जपला. शिस्त, व्यासंग, मेहनत, आवाजावर हुकुमत, प्रतिपादनाची उत्कृष्ट शैली, विरोधी मताबद्दल कमालीचा आदर या सर्वांमुळे वकिली व्यवसायात बापूंनी आदर्श उभा केला. बापूंनी दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही शाखांमध्ये उदंड यश कमावलं. बापू जेव्हा केसचा अभ्यास करीत तेव्हा पूर्ण केस अक्षरश: पिंजून काढीत. सर्व संबंधित कायदा, केस लॉ आणि वस्तुस्थिती अत्यंत बारकाईने अभ्यासत असत.
बापूंचे आजोबा रावबहाद्दूर परुळेकर यांनी रत्नागिरीत १८८७ मध्ये वकिली व्यवसायाची पहिली वीट लावली. बापूंनी प्रत्यक्ष प्रॅक्टिस १९५० मध्ये सुरु केली. खरं तर बापूंनी डिफेन्समध्ये जाण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. परंतु एअरफोर्समध्ये कमिशन मिळवून जायचे त्यांच्या मनाने पक्के केले होते. अर्थात घरातून विरोध होता. वकिली व्यवसाय सुरु केल्यानंतर बापूंना कधीच मागे वळून पाहावे लागले नाही.
१९७७ मध्ये जनता पक्षाच्या तिकीटावर बापू रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. उत्कृष्ट वक्तृत्त्व, अभ्यासू वृत्ती यांच्या जोरावर अल्पावधीत बापूंनी लोकसभेत उत्कृष्ट संसदपटू म्हणून मोहोर उमटविली.
संसदेच्या सभागृहात फिरोज गांधी बसत असत, तेथेच गप्पांचा फड रंगत असे. अधून-मधून फिरोज गांधी त्यात सामील होत असत. रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदापासून दोनदा खासदार म्हणून बापूंनी यशस्वी राजकीय नेतृत्त्व केलं. परंतु त्याहीपेक्षा अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे बापू मला भावून जातात.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वैचारिक अधिष्ठान बापूंच्या भूमिकेला लाभलं आहे. सावरकरांचा हिंदुत्ववाद आणि विज्ञाननिष्ठा बापूंच्या धमन्यांतून वाहत आहे. सावरकर विचार बापूंचा श्वास आणि ध्यासही आहे. सावरकर हा जगण्याचा आणि विचाराचा विषय आहे, असं त्यांचं प्रतिपादन असे.
बापूंनी नगरपालिका, संसद, रत्नागिरी शिक्षण संस्था, पतितपावन मंदिर आदि संस्थांमध्ये स्वतःची वैचारिक भूमिका घेऊन काम केलं. तत्वनिष्ठ भूमिका, मूल्यांचा आग्रह आणि पारदर्शक व्यवहार ही त्यांच्या जीवनाची त्रिसूत्री आहे. सार्वजनिक व्यवहार, पैशांबाबत त्यांची भूमिका विश्वस्ताची होती. साधनशुचिता आणि सभ्यता यांचा त्यांनी समाजात वस्तुपाठ निर्माण केला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिलं.
व्यावसायिक राजकारणाचा त्यांना कमालीचा तिटकारा होता. समाजातल्या शेवटच्या माणसाच्या भल्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि निर्लेपपणे त्यातून बाहेरही पडले. बापूंचं बोट धरून आमच्या पिढीने राजकारणात आणि वकिलीत प्रवेश केला. बापूंची उपस्थिती आणि मार्गदर्शन कायमच आश्वासक होते. समाजाला दिशा देणारे आणि वळण देणारे बापू आता आता आपल्यात नाहीत.
हेही वाचा