पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडे श्वानदंशाप्रमाणे मांजरांनी चावा घेतल्याच्या तक्रारीही दाखल होत आहेत. मांजर चावल्यानंतरही रेबीज होण्याची शक्यता असते. यंदा जानेवारी ते मे या सहा महिन्यांच्या कालावधीत 1869 नागरिकांना मांजरांनी चावा घेतला आहे. मागील वर्षी ही संख्या 2710 इतकी होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मांजर नसबंदी कार्यक्रम सुरू केला होता. सप्टेंबरपासून आतापर्यंत 3 हजारांहून अधिक मांजरांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे बरेचदा नागरिकांचे नुकसान होते. त्यामुळे कुत्र्यांच्या सुळसुळाट कमी व्हावा, यासाठी महापालिकेकडे वारंवार तक्रारी प्राप्त होत असतात. त्यातुलनेत मांजरांने चावा घेतल्याच्या घटनांकडे फारसे लक्ष जात नाही. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मांजरांनी घेतलेल्या चाव्यांची आणि लसीकरणाचीही नोंद ठेवली जात आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात 2022 मध्ये एकूण 2 हजार 710 मांजर चावण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जानेवारी ते मे या पाच महिन्यांत 1869 जणांना मांजर चावण्याच्या घटनांची नोंद झाली. मागील वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास 70 टक्क्यांनी वाढले आहे.
आरोग्य विभागातर्फे मांजरींसाठी नसबंदी आणि लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सप्टेंबर ते मार्च दरम्यान, महापालिकेने 3 हजार 172 मांजरांचे निर्बीजीकरण केले आहे. राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत सर्वाधिक मांजरांची नसबंदी पुणे महापालिकेने केली आहे.
-डॉ. सारिका फुंडे, पशुवैद्यकीय अधिकारी