गद्दारीचे खरे कारण खोकेच : संजय राऊत | पुढारी

गद्दारीचे खरे कारण खोकेच : संजय राऊत

ढेबेवाडी; पुढारी वृत्तसेवा :  जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त करत आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ; पण फौजदाराचा हवालदार म्हणून नाही. अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह गद्दार आमदारांनी गद्दारीचे खरे कारण अजूनही सांगितले नसून, केवळ खोक्यांसाठी शिवसेनेसोबत त्या सर्वांनी गद्दारी केल्याचा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

गुढे (तळमावले, ता. पाटण) येथील गणेश मंगल कार्यालयात पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षल कदम, सचिन मोहिते, तालुकाध्यक्ष सचिन आचरे यांच्या उपस्थितीत खासदार संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.

खासदार संजय राऊत यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार, भाजपाचे नेते यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यात पंढरपूरला एक आणि मुंबईत मातोश्रीमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने दोन विठ्ठल आहेत. 40 गद्दार आमदारांपैकी एकही विधानसभा निवडणुकीत विजयी होणार नाही. शंभूराज देसाई यांना लाल दिवा प्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी तर दुसर्‍यांदा उद्धव ठाकरे यांनी दिला. मात्र त्यानंतरही गद्दारी करून सरकार पाडल्याने त्यांना शिवसेनेत कधीही थारा मिळणार नाही.

गद्दारांचे सरकार आल्यापासून राज्यातील उद्योग गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रापेक्षा गुजरातचेच हित अधिक पाहिले जात आहे. शिवसेना 40 गद्दारांना देण्याचे पाप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. मात्र बचेंगे तो और भी लढेंगे असे सांगत आम्ही केवळ लढणार नाही, तर तुम्हाला खतम करून जिंकणार हा शिवसेनेचा इतिहास आहे, हे लक्षात ठेवा असा इशाराही खा. राऊत यांनी यावेळी दिला.

स्व. लोकनेेते बाळासाहेब देसाई यांनी शिवसेना स्थापनेपासून शिवसेनेला सहकार्य केले. त्यांनी कधीही गद्दारी केली नाही आणि आयुष्यभर निष्ठा जोपासली. मात्र त्यांच्याच घराण्यात शिवसेना फोडणारा गद्दार आहे, हे पाटण तालुक्याचे दुर्दैव आहे. विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिक त्यांचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी नितीन बानुगडे-पाटील, हर्षल कदम यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले.

Back to top button