साडवली : पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यात आज (दि.२३) दुपारी २ वाजल्यापासून पावसाने दमदार आगमन करत जोरदार हजेरी लावली. अचानक बरसलेल्या पावसामुळे वाहनचालक, व्यापारी व नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
गेले काही दिवस तालुक्यातील वातावरण ढगाळ होते. मात्र, पाऊस पडत नव्हता. उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. तर पेरणीची कामे झाल्यामुळे शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अखेर आज दुपारी २ वाजल्यापासून पावसाने बरसायला सुरूवात केली. बराचवेळ पाऊस बरसत होता. पावसाच्या आगमनाने मात्र बळीराजा सुखावला आहे. शेतीची कामे करण्यास शेतकरी मोकळा झाला आहे. दुसरीकडे पाऊस बरसल्याने हवेत गारवा आला असून गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील देवरूखसह साखरपा, संगमेश्वर, आरवली, तुरळ, डिंगणी, आंगवली, दाभोळे परिसरासह तालुक्यात पावसाने जोरदार आगमन केले. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सायंकाळपर्यंत तालुक्यात ढगाळ वातावरण होते. काळे ढग दाटून आले होते.
हेही वाचा