रत्नागिरी : वाशिष्ठी डोहात बुडून दोघांचा मृत्यू | पुढारी

रत्नागिरी : वाशिष्ठी डोहात बुडून दोघांचा मृत्यू

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील ओमळी येथील एका बालकासह तरुणाचा वाशिष्ठी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. मासे पकडण्यासाठी गेलेले दोघेजण डोहात बुडून मृत्युमुखी पडले. यामध्ये ओमळी गोंधळेवाडी येथील विक्रम रवींद्र देवांग (23) व हर्षल अनिल यादव (11) या दोघांचा समावेश आहे. पाली येथील वाशिष्ठीच्या डोहात ही घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम आणि हर्षल हे सोमवारी सकाळी घरातून निघून गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने शंकर यादव व लक्ष्मण रसाळ (रा. ओमळी) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तसेच ते सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत घरी आले नाहीत म्हणून सोशल मीडियावर मेसेज फिरविण्यात आला होता. सोमवारी सकाळी 8:30 वा. मोटारसायकल घेऊन घरातून बाहेर पडलेले दोघेही सायंकाळी घरात आले नाहीत म्हणून त्यांचा शोध घेण्यात येत होता. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी देखील शोध सुरू केला. अखेर मंगळवारी (दि.20) सकाळी खांदाट पाली येथील वाशिष्ठी नदीपात्रात मारूती मंदिराजवळील डोहात या दोघांचे मृतदेह सापडले.

सोमवारी सकाळी मासे पकडण्यासाठी हे दोघेजण पाली येथील वाशिष्ठी नदीमध्ये डोहात उतरले. यावेळी त्यांनी दुचाकी, मोबाईल व अन्य वस्तू पाली पुलावर ठेवल्या होत्या. सायंकाळी घरी न आल्याने ते बेपत्ता असल्याची फिर्याद चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल झाली व मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान पाली येथील डोहात हर्षलचा मृतदेह सापडला. यानंतर काही वेळात याच डोहात विक्रम याचा मृतदेह आढळला. दोघांचेही मृतदेह बाहेर काढून ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर कामथे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनास ते पाठविण्यात आले. सायंकाळी उशिरा ओमळी येथे शोकाकूल वातावरणात या दोन मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मासे पकडणे बेतले जीवावर

विक्रम आणि हर्षल हे मासे व बोये काढण्यासाठी या डोहात उतरल्याचे पुढे येत आहे. त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या पोटाला मुळे बांधलेले आढळले. पाचवीत शिकणार्‍या हर्षलला पोहता येत नव्हते. त्यामुळे कदाचित तो बुडत असताना त्याला वाचविताना विक्रमही बुडाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. मासे पकडण्याच्या नादात या दोघांनी आपला जीव गमावला आहे.

Back to top button