माझं वय झालं, पहिली दोन वर्षे मला मुख्यमंत्रिपद द्या; सिद्धरामय्या यांचा फॉर्म्युला

माझं वय झालं, पहिली दोन वर्षे मला मुख्यमंत्रिपद द्या; सिद्धरामय्या यांचा फॉर्म्युला
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोघेही मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत. दोघांनीही मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून कंबर कसली आहे. सिद्धरामय्या यांनी तर मुख्यमंत्रिपदावर थेट दावा केला आहे. मला आधी दोन वर्षासाठी मुख्यमंत्रिपद द्या. त्यानंतर डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद द्या, असा प्रस्तावच सिद्धरामय्या यांनी काँग्रेस हाय कमांडसमोर ठेवला आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली असून, त्यावर कसा मार्ग काढला जातो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कर्नाटकात काँग्रेसने प्रचंड यश मिळवले आहे; पण या प्रचंड यशाबरोबर प्रचंड ताणही निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रिपद हे त्याला कारण आहे.

काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी पक्षासमोर एक फॉर्म्युला ठेवला आहे. आधी दोन वर्षे मला मुख्यमंत्रिपद द्या. त्यानंतर तीन वर्षे शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद द्या, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. माझे वय झाले आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पहिल्या टप्प्यात सरकार चालवावे अशी माझी इच्छा आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. मात्र, शिवकुमार यांनी राजस्थान आणि छत्तीसगडची उदाहरणे देऊन हा फॉर्म्युला फेटाळून लावला आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी आमदारांकडे पाठबळ मागितले आहे.

जर डीकेशिंना विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडल्यास सिद्धरामय्यांची समजूत कशी घालायची, त्यांना कोणती जबाबदारी द्यायची, असा प्रश्न काँग्रेस हायकमांडला पडला आहे. शिवाय गेल्या तीन वर्षांपासून डीकेंनी पक्षासाठी प्रचंड खस्ता खाल्ल्या आहेत. पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री बनवले नाही तर पक्षात चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यांना मुख्यमंत्रीपद दिले तर सिद्धरामय्या नाराज होतील. त्यामुळे अडकित्त्यात सुपारी अडकावी तशी काँग्रेसची अवस्था झाली आहे.

सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना केंद्रीय नेतृत्वाने दिल्लीला बोलावले आहे. काँग्रेस आमदारांमध्ये नेता निवडीसाठी मतदान झाल्यानंतर हे बॅलेट बॉक्स काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर ठेवले जाणार आहेत. त्यांच्यासमोरच ही मतांची गणती होणार आहे. त्यासाठी सोमवारी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांना दिल्लीला बोलावले आहे. मुख्यमंत्रीपदावर काँग्रेस उद्या मंगळवार किंवा बुधवारपर्यंत निर्णय घेणार आहे. गुरुवारी नवे मुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत 30 कॅबिनेट मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news