

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : बारसू परिसरात कातळशिल्पांसारख्या हजारो वर्षे जुन्या गोष्टी सापडल्या आहेत. त्याबाबत युनेस्कोकडून तपासणी सुरू आहे. त्यांच्या पहिल्या यादीत बारसूचे नाव आहे. प्रत्यक्षात तुम्हाला काहीच सांगितले जात नाही, ही शोकांतिका आहे. हजारो वर्षे जुनी कातळशिल्पे युनेस्कोच्या यादीत गेल्यावर ती तुमची राहत नाहीत. या ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर कोणतीही डेव्हलपमेंट करता येत नाही. अशी ठिकाणे केंद्र व राज्य सरकारला जगासाठी उपलब्ध करून द्यावी लागतात. त्यामुळे बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होऊ शकत नाही, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी रत्नागिरी येथील सभेत व्यक्त केला. (Raj Thackeray)
कोकण हा परमेश्वराचा आशीर्वाद मिळालेला हा भाग आहे. त्याची वाट लागतेय. रिफायनरी नाणार होणार की बारसूला होणार यातच राजकारणी आपल्याला गुंतवून ठेवतात. मात्र आपल्याकडील जमीन पायाखालून निघून जाते, हे कळत नाही. लोकप्रतिनिधींना माहित असते, पण कवडीमोल भावाने विकत घेतात. नुसता व्यापार सुरु आहे.ग्रामस्थ गणपती, होळीला एकत्र येतात. चर्चा होत नाही का, मंदिरात गप्पा मारता त्यावेळी जमिनी विकत गेल्या हे कळत नाही. व्यापारी बनून आपलीच लोक जमिनी विकत घेतात, सरकारला व्यापारी दराने विकतात हे आपल्याला कळत नाही का ? असा सवालही राज ठाकरे यांनी केला. (Raj Thackeray)
कोकणचा संपन्न भागमहाराष्ट्राला भारतरत्न आहेत, आठ जण आहेत. त्यातील सहा भारतरत्न कोकणातील आहेत. त्यातील चारजण एकट्या दापोली परिसरातील आहेत. इतका संपन्न कोकण तुम्हाला हे राजकारणी फसवतात कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (Raj Thackeray)
रत्नागिरीनजीकच्या भाट्ये येथील मायाजी भाटकर आणि मायनाक भंडारी या दोघांनी छत्रपती शिवराजांचे आरमार सांभाळले. त्या शिवरायांनी शत्रु हा समुद्रमार्गे येईल असे सांगितले होते. मुंबईतील बॉम्बस्फोट समुद्रमार्गेच झाला, असेही राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray)
2013 पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीने समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक बांधण्याचे जाहीर केले. मात्र त्यानंतर राज ठाकरे त्याला विरोध करतोय असे पसरवण्यास सुरुवात केली.? ? शिवछत्रपती ही आमची ओळख आहे. ज्या छत्रपतींचे महापुरुषांचे नाव घेत नव्हते. तेच माझी बदनामी करीत होते. हजार कोटी रुपये स्मारकात खर्च करण्यापूर्वी छत्रपतींचे गडकिल्ल्यांचे संरक्षण प्रथम करा, असे आपण सांगितले होते. मात्र, आपल्याबाबत गैरसमज परविण्यात आले. शिवछत्रपतींचे विचार मारण्यासाठी आग्य्राहून औरंगजेब महाराष्ट्रात आला. एवढे शिवरायांचे प्रगल्भ विचार आपण पुढील पिढीपुढे पोहचवायला नकोत का? त्यांनी उभे केलेले गड किल्ले, पुढील पिढीला स्फूर्ती देतील,असेही ते म्हणाले. (Raj Thackeray)
कोकणासारखीच नैसर्गिक स्थिती लाभलेले केरळसारखे राज्य केवळ पर्यटनावर चालते. कोकण हे परमेश्वरी कृपा लाभलेला भाग आहे. तो अख्खा महाराष्ट्र राज्याला पोसू शकतो. मात्र राजकारणार्यांना हे करायचेच नाही, असाही आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र संपन्न राज्य असून, त्याच्यावर सर्वांचा डोळा आहे. महाराष्ट्राच्या बाहेर उद्योग जाणे परवडणारे नाही. येथील युवक-युवतींसाठी उद्योग उभे राहणे आवश्यक आहे. भविष्यात महाराष्ट्रात अशी परिस्थिती होईल की, पगार होणेही मुश्कील होईल,असे वास्तव राज ठाकरे यांनी मांडले.
लोकप्रतिनिधींनी व्यापार मांडला आहे. त्यांना एकत्र बसवून काय तो राग काढा. शिवसेना खासदार म्हणतो पाठिंबा देणार नाही, आमदार म्हणतो पाठिंबा देणार, पक्ष म्हणून नेमकी भूमिका काय ? असा प्रश्नही उपस्थित केला. लोकप्रतिनिधी कधी या प्रदेशाची धुळधाण करतील हे कळणारही नाही. या सगळ्यातून तुम्ही कोकण वाचवा, एवढी अपेक्षा व्यक्त करतो,असेही राज ठाकरे म्हणाले. या सभेला माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, मनोज चव्हाण, अभिजीत पानसे, अविनाश जाधव, संदीप देशपांडे, रिटा गुप्ता, दिलीप धोत्रे, अमेय खोपकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अजूनही मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण का?
2007 मध्ये मुंबई – गोवा महामार्गाचे काम सुरू झाले, अजूनही पूर्ण होत आहे. मात्र, समृद्धी महामार्ग नागपूरहून शिर्डीपर्यंत आला व लोकांच्या गाड्याही त्यावरून जाऊ लागल्या. त्या केवळ चार वर्षांत, मात्र गेली 16 वर्षे मुंबई – गोवा महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. येथे निवडून येणार्या लोकप्रतिनिधींचा संबंध केवळ मतदानापुरताच आहे. आपण कोकणातून मुंबईला गेल्यानंतर रस्त्याची दुरवस्था पाहून देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलण्यास सांगितले. त्यांच्याशी मी फोनवर बोललो. ते म्हणाले, कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. कोकणातील लोकप्रतिनिधी हे तुम्हाला गृहीत धरीत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
अधिक वाचा :