गुहागर, पुढारी ऑनलाईन : गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील बंदर विभागाच्या मालकीच्या जागेतील अतिक्रमण करणाऱ्या २२ खोकेधारकांची बांधकामे तोडण्यास बंदर विभागाने मंगळवारी (ता. १२) सुरुवात केली. सकाळी राजकीय पक्षांतर्फे तसेच गुहागरातील नागरिकांतर्फे कारवाई होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी भूमिकेवर ठाम रहात दुपारी १२.३० वाजता अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली.
या जमिनीतील सर्व अनधिकृत बांधकामे विनाविलंब हटविणेत यावीत अन्यथा १२ ऑक्टोबरला अतिक्रमण हटवू, अशी अंतिम नोटीस सहाय्यक बंदर निरिक्षक, पालशेत यांनी खोकेधारकांना दिली होती. पहिली नोटीस आल्यानंतर ही कारवाई थांबवावी म्हणून काही खोकेधारकांनी न्यायालयाकडे दाद मागितली आहे. मात्र शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम असल्याने न्यायालयाकडून जैसे परिस्थिती राहील, असा कोणताही आदेश अद्याप आलेला नाही.
त्यामुळे बंदर विभागाने नोटीसीत जाहीर केल्याप्रमाणे मंगळवारी (१२ ऑक्टोबर) अतिक्रमण हटविण्याची भूमिका घेतली. मंगळवारी सकाळी बंदर विभाग अतिक्रमण हटविणार म्हटल्यावर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी धावपळ सुरू केली. आपापल्या नेत्यांना संपर्क करण्यात आला. आजची कारवाई थांबवावी, अशी विनंती करण्यात आली.
तर गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, शिवतेज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, युवा सेना जिल्हाधिकारी सचिन जाधव यांनी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन विनायक उगलमुगले, तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांची भेट घेऊन कारवाई थांबविण्याची विनंती केली.
मात्र प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावात न येता कारवाई करणारच अशी भूमिका घेतली. खोकेधारकांना दुपारी १२ वाजेपर्यंत खोक्यातील चिजवस्तू काढून घेण्यास मुदत दिली. त्यानंतर अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केली. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी विनायक उगलमुगले, बंदर अधिक्षक बोरगे, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन बारी, महावितरण, महसूल, नगरपंचायतचे अधिकारी उपस्थित होते.