Ram Navami Nashik : अवघे नाशिक प्रभू रामचंद्रांच्या भक्तीत दंग ; पाहा फोटो | पुढारी

Ram Navami Nashik : अवघे नाशिक प्रभू रामचंद्रांच्या भक्तीत दंग ; पाहा फोटो

नाशिक : ढोल-ताशांचा गजर, नभी फडकणारी भगवी पताका आणि ‘सियावर रामचंद्र की जय’चा घोष अशा भक्तिमय वातावरणात गुरुवारी (दि.३०) रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. पंचवटीमधील प्राचीन श्री काळाराम मंदिरात पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली. यावेळी अवघे शहर प्रभू रामचंद्र यांच्या भक्तीत दंग झाले.

याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे व राहुल ढिकले, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, अनिल ढिकले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महंत सुधीरदास पुजारी यांनी पालकमंत्री भुसे यांचे स्वागत केले. रात्री उशिरापर्यंत भाविक श्री काळाराम चरणी नतमस्तक झाले. यावेळी मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले.
महिला भाविकांनी फुगडीचा फेर धरत जन्मोत्सवाचा आनंद व्यक्त केला.

पालकमंत्री दादा भुसे देखील हाती टाळ घेत या भक्तीमय वातावरणात दंग झाल्याचे पाहायला मिळाले.
मंत्रोच्चाराच्या जयघोषात पहाटे श्रींच्या मूर्तींना मंगलस्नान घालण्यात आले. दुपारी १२ ला ‘जय सीता राम सीता, बोल सियावर रामचंद्र की जय’ निनादात प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यंदाचे मानकरी समीर पुजारी यांच्या हस्ते रामरायाचे विधिवत पूजन करण्यात आले.
काळाराम मंदिर परिसरात भाविकांना पंजरी व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या व्यतिरिक्त शहर परिसरातील विविध मंदिरांमध्ये सामाजिक व धार्मिक संस्था, मित्रमंडळाच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भक्तांना साबुदाणा खिचडी, केळी, राजगिरा लाडू आदी फराळाचे वाटप करण्यात आले.

सर्व छायाचित्रे : हेमंत घोरपडे

यंदाच्या वर्षी निर्बंधमुक्त रामनवमी साजरी होत असल्याने रामभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला.

 

Back to top button