रत्‍नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १९ मार्चला जाहीर सभा; ठाकरेंच्या सभेला प्रत्‍युत्‍तर देण्याची रणनीती | पुढारी

रत्‍नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १९ मार्चला जाहीर सभा; ठाकरेंच्या सभेला प्रत्‍युत्‍तर देण्याची रणनीती

खेड शहर: पुढारी वृत्तसेवा उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रत्यूत्तर म्हणून १९ मार्चला त्याच ठिकाणी, त्याच मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सभा घेणार असून, व्याजासहित उत्तरे देणार असल्याचे रामदास कदम यानी काल (रविवार) जाहीर केले.
या सभेला मंत्री गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई व आमदार भरत गोगावले उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे पहिलेच नेते असतील की, स्वतःच्या पक्षाच्या आमदाराला राजकारणातून संपवायचे आणि दुसऱ्याचा आमदार भाड्याने विकत घ्यायचा. पण, असे प्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी केले नव्हते.

मुंबई, पुणे, ठाणे येथून भाड्याची माणसे आणून किती प्रयत्न केले तरी रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना राजकारणातून कोणीही संपवू शकत नाही, असा घणाघात माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते रामदास कदम यांनी जामगे (ता. खेड) येथे बोलताना केला.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खेड येथील गोळीबार मैदानावर जाहीर सभा काल झाली. या सभेबाबत बोलताना रामदास कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.

ते म्हणाले की, एकदा नाही शंभरवेळा जरी उद्धव ठाकरे खेडला आले तरी आम्हाला पराभूत करू शकत नाहीत. उलट तुम्ही जितक्या वेळा याल तेवढे अधिक लीड आमचे वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांचा धसका घेतला आहे. त्यामुळे खेडमध्ये बाहेरची माणसे आणून विराट सभेचा दिखावा केला जात आहे. जणू ही शिवाजीपार्कचीच सभा वाटत आहे.

बाहेरची माणसे आणून स्थानिक राजकारण करता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला. दापोली मतदारसंघातील दोन-चार टक्के तरी लोक यांच्यासोबत आहेत का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : 

Back to top button