काँग्रेसकडून 9 रोजी कर्नाटक बंदची हाक | पुढारी

काँग्रेसकडून 9 रोजी कर्नाटक बंदची हाक

तुमकूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात दि. 9 मार्च रोजी कर्नाटक बंदची हाक केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे. तुमकूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यामध्ये भाजप सरकारकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या सरकारविरोधात एकत्रित लढा देण्याची गरज आहे. यासाठी या बंदला व्यापार्‍यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन डी. के. शिवकुमार यांनी केले.

बंद काळामध्ये शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, रुग्णांना त्रास होऊ नये. कायदा हातात न घेता बंदला पाठिंबा द्यावा. भ्रष्टाचारमुक्त राज्य करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून सर्व संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. भाजपमुळे राज्याची प्रतिमा मलिन झाली आहे. कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्षांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 40 टक्के कमिशनबाबत तक्रार केली आहे. याबाबत कोणतेच उत्तर देण्यात आले नाही. कोणाला खाऊ देणार नाही आणि खाणारही नाही असा केवळ नारा दिला जात आहे. प्रत्यक्षात कृती कोणतीच नाही, असा आरोप डीकेशि यांनी केला.

सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचाराची जनतेला चांगलाच माहीत आहे. याकडे राज्यातील जनतेचे लक्ष वेधण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी विचारणा केलेले सर्व साक्षी, पुरावे लोकायुक्त अधिकार्‍यांकडून सादर करण्यात आले आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार उघड झाला आहे. याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही डी. के. शिवकुमार यांनी केली. यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी व काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

Back to top button