तुम्ही पक्षाचे नाव चोरले, मात्र शिवसेना चोरू शकणार नाही : उद्धव ठाकरेंचा घणाघात | पुढारी

तुम्ही पक्षाचे नाव चोरले, मात्र शिवसेना चोरू शकणार नाही : उद्धव ठाकरेंचा घणाघात

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही शिवसेना हे नाव चोरले मात्र शिवसेना चोरू शकणार नाही. धनुष्यबाण चोरु शकता मात्र ते तुम्हाला पेलवणार नाही. ढेकणं चिरडायला एक बोट काफी आहे. ज्यांना कुटंब मानलं त्यांनी आईवरच वार केला. शिवसेना ही आपली आई आहे, शिवसेना नसती तर हे कोण असते. शिवसेना नाव बाजूला ठेवून तुमच्या आई वडिलांचे नाव लावून पक्ष बांधणी करुन दाखवा, अशा शब्‍दात ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. खेडच्या गोळीबार मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

 निवडणुक आयोगाचे म्हणणे आम्हाला मान्य नाही. आयोग चिन्ह देऊ शकतं, पण पक्ष नाही. आम्ही ते देऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्‍हणाले. भाजपच्या मागे बाळासाहेब उभे नसते तर भाजपचे काय झाले असते, असा सवालही त्‍यांनी यावेळी केला.

महाराष्ट्रातील उद्योगांकडे बघायची कोणाची हिंमत होत नव्हती. सध्या महाराष्ट्रातील तरुणांच्या नोकऱ्या हिरावून नेल्या जात आहे. सगळे उद्योधंदे गुजरातला नेले जात आहेत, महाराष्ट्राला काही द्यायचे नाही. उद्योग बाहेर पाठवायचे आणि फुटक्या एसटीवर प्रगत महाराष्ट्र असे फोटो लावायचे, असा टोलाही त्‍यांनी यावेळी लगावला.

तुमचा सगळा वेळ फिरण्यात, दिल्लीला मुजरा करण्यात जात आहे, अख्खं महाराष्ट्र माझे कुटुंब आहे, आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे. गुवाहाटीला फिरुन महाराष्ट्र फिरू शकत नाही, अशी बोचरी टीकाही त्‍यांनी यावेळी केली. वेळ आली आहे खंडोजी खोपडे कोण आणि कान्होजी जेधे कोण हे ओळखण्याची. आम्ही तळवे चाटले म्हणत आहेत, मग तुम्ही काय करत आहात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जो धनुष्यबाण घेऊन समोर येईल तो चोर आहे हे लक्षात ठेवा असे देखील ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button