Online Fraud : स्‍वस्‍त ‘आयफोन’चा मोह नडला! तरुणाला तब्‍बल २९ लाखांचा गंडा | पुढारी

Online Fraud : स्‍वस्‍त 'आयफोन'चा मोह नडला! तरुणाला तब्‍बल २९ लाखांचा गंडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सोशल मीडियाद्वारे खरेदी करताना सावधानगी बाळगण्याची गरज आहे. सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. दिल्लीमधील एका तरुणाला असाच स्‍वस्‍तात आयफोनचे आमिष दाखवून तब्बल २९ लाखांना गंडा घातल्‍याचे प्रकरण समोर आले आहे.

या प्रकरणी तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, विकास कटियार हा तरुण दिल्लीचा रहिवासी आहे. त्‍याला काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्याला वेबपेज आढळले. यावर भरघोस डिस्काऊंट आणि इतर काही आकर्षक ऑफरने आयफोनच्या विक्रीची ऑफर होती. विकासला या ऑफर लाभ उठविण्याचा मोह आवरला नाही. त्याने त्या इन्स्टाग्राम पेजवर क्लिक करुन विक्रेत्याशी संपर्क साधला.विकासने आयफोन खरेदीसाठी २८ हजार इतकी अगाऊ रक्कम ऑनलाईन पेमेंटच्या सहाय्याने दिली.

पेमेंट केल्यानंतरविकासला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येण्यास सुरुवात झाली. यामध्ये करसंबंधित कंपन्या, कस्टम होल्डिंग अशा काही कंपन्याच्या नावाने त्याला फोन येण्यास सुरुवात झाली. यामध्ये खरेदीचा एक भाग म्हणून त्याला वेगवेगळ्या कारणास्तव आणखी पेमेंट करण्याची मागणी केली जात होती. विकासदेखील या सर्व बाबींची पूर्तता करता गेला. स्वस्तातला आयफोन मिळवण्यासाठी त्याचा हा सर्व अट्टाहास सुरुच होता. मात्र एवढे करुन देखील त्याला फोन मिळालाच नाही. शेवटी या सर्व प्रकारामध्ये त्याच्या बँक अकाऊंटवरुन २८,६९,८५० रुपयांचा ऑनलाईन व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विकासने सायबर क्राईम कक्षात या सर्व घटनेची तक्रार दिली.

ऑनलाईन फसवणूक टाळण्‍यासाठी ‘ही’ काळजी घ्‍या

सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन गंडा घातल्याचे विकासचे हे पहिलेच प्रकरण नाही. याआधी देखील विविध सण आणि उत्सवांमध्ये आलेल्या ऑफरला अनेक लोक बळी पडल्याचे आढळून आले आहे. ऑनलाईन खरेदी करताना सावध असणे आवश्यक आहे. कोणतीही सायबर फसवणूक टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. बँकिंग तपशील, OTP आणि ATM पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये. मोफत भेटवस्तू किंवा सवलतीच्या नावाखाली बँकिंग माहिती आणि OTP कोणालाही देऊ नका. विकासची केलेली फसवणूक ही या सर्व गोष्टींची काळजी न घेतल्यामुळेच झाली आहे. अनोळखी विक्रेत्यांकडून ऑनलाइन व्यवहार करताना विशेषत: सोशल नेटवर्किंग साइट्सवर सावधगिरी बाळगा. कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी, विक्रेत्याची वैधता, पुनरावलोकन आणि रेटिंग तपासा, असे आवाहन सायबर सेलकडून वारंवार केले जाते.

हेही वाचा

Back to top button