Manish Sisodia : सीबीआयकडून मनीष सिसोदिया यांची छळवणूक; 'आप' चा गंभीर आरोप | पुढारी

Manish Sisodia : सीबीआयकडून मनीष सिसोदिया यांची छळवणूक; 'आप' चा गंभीर आरोप

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची सीबीआयने छळवणूक चालविली असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या सिसोदिया (Manish Sisodia) यांना गेल्या आठवड्यात सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर विशेष न्यायालयाने त्यांची कोठडीत रवानगी केली होती. खोटे आरोप असलेल्या कागदपत्रांवर साह्य करण्यासाठी सिसोदिया यांच्यावर दबाव आणला जात असल्याचे भारद्वाज यांनी सांगितले. सिसोदिया यांना सोमवारपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्‍या सीबीआय कोठडीत ६ मार्चपर्यंत वाढ करण्‍यात आली. राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दरम्यान, मनीष सिसोदियांच्या जामीन याचिकेवर विशेष सीबीआय न्यायालयाने शनिवारी सुनावणी घेत निकाल राखून ठेवला. १० मार्चला दुपारी २ वाजता न्यायालयाकडून निकाल सुनावला जाईल. सिसोदियांची सीबीआय कोठाडी संपत असल्याने त्यांना   न्यायालयात हजर करण्यात आले होते.

दरम्यान, चौकशीत सहकार्य करीत नसल्याचे सांगत सीबीआयने सिसोदियांच्या ३ दिवसांच्या वाढीव कोठडीची मागणी केली. साक्षीदारांच्या समोर बसवून सिसोदियांची चौकशी करायची असल्याचे देखील सीबीआयाने विशेष सीबीआय न्यायाधीश एम.के. नागपाल यांच्या न्यायालयात सांगितले. यावर न्यायालयाने सिसोदियांना दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.

दिल्ली सरकारमधील काही अधिकारी तसेच काही डिजिटल पुरावे समोर ठेवून सिसोदियांची चौकशी तसेच षडयंत्राचा तपास करायचा आहे, असे सीबीआयने न्यायालयात सांगितले. यावर न्यायाधीशांनी किती तास चौकशी करायची आहे? असा सवाल उपस्थित केला असता सीबीआयच्या वकिलाला समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही.

हेही वाचा 

Back to top button