

राजापूर; पुढारी वृत्तसेवा: ओणी – अणुस्कुरा मार्ग खड्डेमय झाला असताना त्याकडे गांभिर्याने लक्ष दिले जात नसल्याने संतप्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पितृपक्षात या रस्त्यासाठी श्रध्दांजली व पिंडदान विधी करण्यात आला.
या प्रसंगी मनसेच्या कार्यकर्त्यानी मुंडन करुन आपला संताप व्यक्त केला.
परिसरात मनसेच्या या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ओणी – अणुस्कुरा मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक मोठ्या संख्येने वाढली आहे.
वाढत्या रहदारीमुळे ओणीपासून अणुस्कुरा घाटापर्यंत या संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे.
यामध्ये प्रामुख्याने सौदळ, खडी कोळवण, रायपाटण, पाचल आदी भागात अनेक ठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत.
काही ठिकाणी तर रस्त्याला तलावाचे स्वरुप आले आहे.
काही ठिकाणी एका फुटापेक्षा मोठे खड्डे पडले असून, दररोज ते अधिकच रुंदावत आहेत. दरम्यान, या संपूर्ण मार्गाची पार दुर्दशा झाली आहे.
गणपती सणातील आलेल्या चाकरमान्यांनी ये- जा करताना हा मार्ग निवडल्यामुळे देखील हा मार्ग आणखीनच खराब बनला आहे.
त्याकडे गांभिर्याने लक्ष देण्यात आले नाही. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यातील पडलेले खड्डे मुजविण्याचे काम सुरु आहे.
त्यामध्ये पावसाचा व्यत्यय येत असल्याने सुरळीत काम करणे अवघड बनत आहे. त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत.
याच दरम्यान शासनासह प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर पाचल विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार मंगळवारी (दि.२८) रोजी पाचल येथे मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
सध्या पितृपक्ष सुरु असल्याने आणि ओणी- अणुस्कुरा मार्ग मृत्यूचा सापळा झाल्याने त्याला श्रध्दांजली अर्पण केली.
पिंडदान करून मनसेने आंदोलन केले. यावेळी भररस्त्यात पडलेल्या खड्ड्याभोवती पिंडदान करण्यात आले.
या वेळी काही मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मुंडन करुन शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याविरुध्द घोषणा देवून संताप व्यक्त केला.
हे आंदोलन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या वेळी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचलंत का?