रत्नागिरी : खेडमध्ये प्रजासत्ताक दिनी सात उपोषणे सुरू | पुढारी

रत्नागिरी : खेडमध्ये प्रजासत्ताक दिनी सात उपोषणे सुरू

खेड; पुढारी वृत्तसेवा : खेड येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात गुरूवारी (दि. २६) प्रजासत्ताक दिनी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर सात वेगवेगळ्या विषयांवर लोकशाही मार्गाने उपोषण सुरू झाले आहेत.

पुरे बुद्रुक

पुरे बुद्रुक येथील ग्रामस्थ आणि सोसायटीचे सभासद अनंत जाधव यांनी उपोषण सुरू केले आहे. विविध कार्यकारी सोसायटीमध्ये झालेल्या कर्जवाटप अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाईची मागणी यामध्ये करण्यात आली आहे.

कोंडिवली बौध्दवाडी

कोंडिवली बौध्दवाडी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या गवठाणच्या जागेवर झालेल्या अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत उपोषण सुरू केले आहे.

वडगाव बुद्रुक

वडगाव बुद्रुक येथे बावीस लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करत ग्रामस्थ सचिन मोरे यांनी मुंबई मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत उपोषण सुरू केले आहे.

लोटे तलारी फाटा

स्वाती गोरे व सखाराम गोरे यांनी लोटे तलारी फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गच्या चौपदरीकरणाच्या कामात बाधित झालेल्या त्यांच्या इमारतीचे मूल्यांकन करून मोबदला मिळावा या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे.

भोस्ते विराचीवाडी

भोस्ते विराचीवाडी येथील समीर शिर्के व कुटुंबीयांनी त्यांच्या घरासमोर असलेल्या चिकन व मटण सेंटर हे अवैध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यामुळे कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने कारवाईची मागणी करत उपोषण सुरू केले आहे.

वेरळ चव्हाणवाडी

वेरळ चव्हाणवाडी येथील शैलेश चव्हाण यांच्या जागेत अनिकेत कदम यांनी पंधरा वर्षे जमीन कसत असल्याचा चुकीचा दाखला दिला. चव्हाण यांच्या जागेवर हक्क दाखवणाऱ्या कदम यांच्यावर कारवाई करावी. तसेच त्यांना मदत करणाऱ्या पोलीस पाटील संजय शिंदे यांना चौकशी होई पर्यंत निलंबित करण्याची मागणी करत उपोषण सुरू केले आहे.

अनंत खोपकर यांनी भूमिहीन असल्याने शेतीसाठी शासकीय भूखंड मिळवा या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे.

ही सर्व उपोषणे खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सुरू असून या उपोषणकर्त्यांची विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी भेट घेतली. भेट घेऊन उपोषण स्थगित होईल अथवा मागे घेतले जाईल याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा

Back to top button