Ratnagiri News : खेडमधील जगबुडी नदीपत्रात आणखी दोन मगरींचा मृत्यू | पुढारी

Ratnagiri News : खेडमधील जगबुडी नदीपत्रात आणखी दोन मगरींचा मृत्यू

खेड शहर; पुढारी वृत्तसेवा : खेड येथील जगबुडी नदीमध्ये गुरुवारी (दि.२६) दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन मगरी मृतावस्थेत आढळल्या आहेत. गेल्या काही महिन्यात या नदीत आतापर्यंत चार मगरींचा मृत्‍यू झाल्‍याचे उघड झाले असून वन्य त्यामुळे निसर्ग प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. (Ratnagiri News)

खेड शहरानजीक जगबुडी पुल भोस्ते ते खेड दरम्यान व सुसेरी या ठिकाणी नदीच्या पात्रात गुरुवारी (दि.२६) दोन मृत मगरी तरंगताना ग्रामस्थांना आढळून आल्या. यापूर्वी दोन मगरी मृतावस्थेत आढळल्या आहेत. या घटनेमुळे पर्यावरण प्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. जगबुडी नदी प्रदूषित झाल्यामुळे मगरींच्या मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच यापूर्वी मृत्यू झालेल्या मगरींचा शव विच्छेदन अहवाल अद्याप मिळालेला नसल्याची देखील चर्चा आहे.

मगरींच्या मृत्यूकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन

आज झालेल्या मगरींच्या मृत्यूमुळे हा विषय आता गंभीर झाला आहे. जगबुडी नदीच्या संवर्धनासाठी व स्वच्छतेसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि.२६) खेडमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ही मॅरेथॉन संपल्यानंतर दोन वेगवेगळ्या ठिकाणी मगरींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. प्रशासन आता तरी जगबुडी नदीतील प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना करणार का, असा सवाल आता पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. (Ratnagiri News)

हेही वाचा

Back to top button