वन विभागाने उपाययोजना कराव्यात; खेड तालुक्यातील जनता बिबट्याच्या हल्ल्यांमुळे भयभीत | पुढारी

वन विभागाने उपाययोजना कराव्यात; खेड तालुक्यातील जनता बिबट्याच्या हल्ल्यांमुळे भयभीत

भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या अनेक गावांत बिबट्याने मानवी जिवांवर हल्ले केल्याने अनेकांना जीव गमवावे लागले. सध्या मानवी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असल्याने शेतकरीवर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मानवी वस्तीत येऊन बिबट्यांच्या होणार्‍या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाने बिबट्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यात आतापर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला. बिबट्यांच्या हल्ल्याने पशुधनाची मोठी हानी झाली आहे.

जिल्ह्याच्या अनेक भागांत सध्या उसाची तोड झाल्याने बिबट्यांच्या निवार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याच्या व भक्ष्याच्या शोधासाठी बिबटे शहरी भागाकडे धाव घेऊ लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी वडगाव पाटोळे येथील महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दि. 19 रोजी भिवेगाव येथील 55 वर्षीय शेतकरी लक्ष्मण रामभाऊ वनघरे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. बिबट्याच्या सततच्या हल्ल्यामुळे माणसे व जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आसखेड खुर्द, कोरेगाव खुर्द, आसखेड बुद्रुक, कुरकुंडी, कोरेगाव बुद्रुक, चांदूस, रेटवडी, जऊळके, जैदवाडी अशा अनेक गावांत बिबट्याने माणसांवर हल्ले केले आहेत. तालुक्याच्या 38 गावांत बिबट्याने जनावरांवर हल्ले केले आहेत. ग्रामीणसह शहरी भागात बिबट्यांचा वावर वाढला असून, 10 महिन्यांपूर्वी चाकण एमआयडीसी मर्सिडीज या बहुराष्ट्रीय कंपनीच्या आवारात बिबट्या आढळला. नानेकरवाडी फाट्याजवळ एका वाहनाने बिबट्याला धडक दिल्याने जखमी अवस्थेतील बिबट्याने चवताळून एका महिलेवर हल्ला केला होता. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावण्याची मागणी होत आहे.

Back to top button