गुहागरमधून सहदेव बेटकर शिंदे गटाचे उमेदवार : रामदास कदम यांची घोषणा | पुढारी

गुहागरमधून सहदेव बेटकर शिंदे गटाचे उमेदवार : रामदास कदम यांची घोषणा

खेड शहरः पुढारी वृत्तसेवा : आगामी 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत गुहागर मतदार संघात शिंदे गटाचे उमेदवार म्हणून सहदेव बेटकर यांच्या नावाची घोषणा नांदगाव येथे झालेल्या सभेत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली. गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे ठाकरे गटाचे आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी कुणबी उमेदवाराची निवड शिंदे गटातर्फे करण्यात आली आहे. सहदेव बेटकर यांनी आतापासूनच कामाला लागावे, असेही कदम यांनी सांगितले.

खाडी पट्ट्यातील सर्व समाजातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी रामदास कदम यांनी ठाकरे गटातील माजी पालकमंत्र्यावर जोरदार टीका केली. माजी पालकमंत्री रविंद्र वायकर यांना कोकणची माहिती नव्हती. रस्त्याची वळणे आली की त्यांना चक्कर यायची. त्यांना रत्नागिरीचे पालकमंत्री केले. त्यानंतर अनिल परब यांना पालकमंत्री केले. ते तर वर्षातून 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला यायचे.

राष्ट्रवादीला सोडा, असे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. पण त्यांनी ऐकले नाही. जुन्या नेत्यांना मंत्रिमंडळात न घेता ५ अपक्षांना घेतले, आणि आम्हाला डावलले. खोके हा विषय मी मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत घेणार आहे. त्यावेळीच त्यावर बोलेन, असा इशारा कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. केवळ हातवारे करून प्रश्न मार्गी लागत नाही, अशी टीकाही कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर यावेळी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button