कोल्हापूर : आता जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे लक्ष | पुढारी

कोल्हापूर : आता जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे लक्ष

कोल्हापूर ; विकास कांबळे :  जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे पाहिले जाते. या निवडणुकीनंतर आता ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे लक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे लागले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघांतील गावांमधील स्थिती निकालानंतर स्पष्ट झाल्यामुळे इच्छुकांनी आता दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे.

ग्रामीण भागातून नेतृत्व करणारी कार्यशाळा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. तालुका पातळीवर नेतृत्व करणार्‍या दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडुकीत संधी दिली जाते. गावाच्या आकारानुसार जिल्हा परिषद मतदारसंघात गावांची संख्या निश्चित करण्यात आलेली असते. गांधीनगर, उचगाव, मुडशिंगी, शिरोली यासारख्या एक-दोन गावांचाच जिल्हा परिषद मतदारसंघात समावेश असतो. ग्रामीण, दुर्गम भागात एका जि.प. मतदारसंघात दहा ते बारा गावांचा समावेश असतो. इच्छुक उमेदवार आपल्या मतदारसंघातील गावांवर लक्ष ठेवून असतात. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ते आपल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची पेरणी करत असतात. त्यामुळे निवडणूक निकालानंतर इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे.

यावेळच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाने मारलेली मुसंडी प्रस्थापितांनाच धक्का देणारी आहे. पूर्वी विरोधी पक्ष ताकदवान नव्हता. परंतु, आता भाजप, शिंदे गटाच्या रूपाने कार्यकर्त्यांना पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिसून आला. ग्रामीण भागात प्रथमच येवढ्या मोठ्या प्रमाणात भाजप आणि नव्याने स्थापन झालेल्या शिंदे गटाला यश मिळाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी देताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.

Back to top button