

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात गडदगव्हाण येथील अंगणवाडीमध्ये गॅस गळती झाल्यामुळे शेगडी आणि स्वयंपाकाच्या प्रवीण राठोड साहित्याला आग लागलेली असताना केंद्रात अडकलेल्या १५ चिमुकल्यांना फुलवाडी येथील महाविद्यालयीन युवक प्रवीण राठोड याने सुरक्षितपणे बाहेर काढले.
बुधवारी प्रवीण हा अंगणवाडीजवळून जात असतानाच त्याला चिमुकल्यांच्या आरडाओरडा ऐकू आला. तेव्हा त्यास अंगणवाडीत गॅस गळती हाऊन शेगडीला आग लागल्याचे दिसले. त्याने धाडस करून प्रथम मुलांना सुरक्षित बाहेर काढले व तत्काळ पोते ओले करून आगीस विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आग आटोक्यात आली. या घटनेत त्याच्या हाताला इजा झाली आहे. प्रवीणने दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत असून, ग्रामस्थांनी त्याचा छोटेखानी सत्कारही केला. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. त्यातील काही जण फोटो काढण्यात मग्न होते. तर काहींनी बघ्याची भूमिका घेतली.