सिंधुदुर्ग : वेंगुर्ले तालुक्यातील सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी | पुढारी

सिंधुदुर्ग : वेंगुर्ले तालुक्यातील सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी

वेंगुर्ले : पुढारी वृत्तसेवा : कोणीही, कुठेही गेले तरी वेंगुर्ले तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा एकमुखी निर्णय आज (दि.२३) घेतला. वेंगुर्ले तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत ऊर्फ बाळू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी यशवंत परब म्हणाले की, सोमवारी (दि. २०) महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेपासून शिवसेनेला हेलावणारी घटना समोर आली. एकनाथ शिंदे व अन्य आमदारांचा गट गुजरातमध्ये गेले. सुमारे ४०-४५ आमदार शिंदे यांच्यासोबत असल्याची बातमी प्रसारमाध्यमांवर येत असताना या मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर हेही त्या गटात सामील झाल्याचे वृत्त आज माध्यमांवर येत आहे. परंतु कोणी – कुठेही गेले तरी आम्ही वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कुणाचेही समर्थक न राहता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहोत, असा एकमुखी निर्णय झाला आहे.

यावेळी पदाधिकारी यांच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर उद्धव साहेब, आदित्य ठाकरे आगे बढो – हम तुम्हारे साथ है, शिवसेनेचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, आवाज कुणाचा – शिवसेनेचा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्यासह शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, सचिन देसाई, उपतालुकप्रमुख उमेश नाईक, युवासेनाचे पंकज शिरसाट, दाभोली सरपंच उदय गोवेकर, वायंगणी सरपंच सुमन कामत, संदिप केळजी, दयानंद खर्डे, संजय गावडे, आनंद दाभोलकर, शैलेश परुळेकर, अण्णा वराडकर, गजानन गोलतकर, वेदांग पेडणेकर, सुयोग चेंदवणकर, राणे, कौशल मुळीक, बटा आदींसह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button