तिलारी परिसरात हत्तीचा उच्छाद; शेतकरी भयभीत (video) | पुढारी

तिलारी परिसरात हत्तीचा उच्छाद; शेतकरी भयभीत (video)

दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा : काही महिन्यांपुर्वी तिलारी खोऱ्यात दाखल झालेल्या पाच हत्तींच्या कळपांनी परिसरात उच्छाद मांडला आहे. या कळपाने शेतीचे नुकसान करत मोठी दहशत माजवली आहे. हा हत्तीचा कळप काही वेळा रात्री वेळी दष्टीस पडत होता. तो आता दिवसा देखिल भर रस्त्यात नागरिकांना यांचे दर्शन होऊ लागले आहे. या कळपाचा वावर आता नागरी वस्तीत आणि घराजवळ होऊ लागल्याने संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यााबाबत वारंवार वनविभागास कळविण्यात आले आहेत. परंतु, हत्तींना रोखण्यासाठी वनविभागाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तकलादू पडल्या आहेत. वनभिगाच्या निष्क्रीयतेमुळे नागरिकांमध्ये संताप पहायला मिळत आहे.

वीस वर्षांपूर्वी कर्नाटकातून दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावात रानटी हत्तींचे सर्वप्रथम आगमन झाले. त्यानंतर हे हत्ती तिलारी खोऱ्यात दाखल झाले. तेथील विपुल प्रमाणातील अन्न‌ व पाणीसाठ्यामुळे ते हत्ती तेथेच विसावले. त्यानंतर त्यांनी बाबरवाडी, हेवाळे, वीजघर ही गावे पादाक्रांत केली. कालांतराने हत्तींनी तेरवण-मेढे, सोनावल, पाळये, केर, मोर्ले, घोटगेवाडी या गावांवर आपली दहशत निर्माण केली. तसेच हे हत्ती शेजारील चंदगड तालुक्यातही भ्रमंती करत असतात.

हंगामानुसार हत्ती तिलारी खोऱ्यात येऊन उपद्रव माजवतात. दोन ते तीन महिन्यांपूर्वी टस्कर, मादी व तीन पिल्ले असा पाच हत्तींचा कळप वीजघर, घाटीवडे, बांबर्डे परिसरात दाखल झाला. हा कळप रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून चालत जाताना देखील पाहिला गेला. काही दिवसानंतर हाच कळपाने केर-भेकुर्ली व मोर्ले गावात येत धुमाकूळ घातला. तसेच हे हत्ती अगदी घरालगत येऊन वावरत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्तींना रोखणे वनविभागाला देखील अशक्य होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान न भरून येणारे

तिलारी खोऱ्यात मुबलक पाणीसाठा असल्याने आजूबाजूच्या गावात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मांगेलीतून तिलारी खोऱ्यात आलेल्या हत्तींनी बाबरवाडी, हेवाळे, घाटीवडे, बांबर्डे, वीजघर परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान करण्यास सुरुवात केली. पोफळीची झाडे, केळी बागायती, भातशेती यांचा फडशा पाडला. मोठ्या कष्टाने पिकवलेली शेती ऐन उत्पन्नाच्या वेळीच हत्ती उध्वस्त करत आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. वनविभाग या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देते. मात्र ही नुकसान भरपाई काही काळच शेतकऱ्यांच्या कामी येते. एक माड एका कुटुंबाला कायमचा पोसतो आणि तोच माड हत्तींनी उध्वस्त केल्यावर मिळणाऱ्या नुकसानभरपाई पासून काही दिवसच कुटुंबाचे गुजराण चालते. तसेच उत्पन्नाचे साधन म्हणून व कर्ज काढून केलेल्या केळी बागायती हत्ती क्षणार्धात नष्ट करतात. त्यामुळे तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांचे हत्तींच्याद्वारे होणारे नुकसान हे न भरून येणारे असेच आहे.

वनविभागाच्या उपाययोजना कुचकामी

हत्तींना रोखण्यासाठी काही वर्षांपूर्वी वनविभागाने तिलारी घाटाच्या पायथ्यापासून ते जंगलात खंदक मारले होते. मात्र ते खंदक हत्तींना रोखू शकले नाहीत. उलट या खंदकामुळे वाहने अडवली गेली. कारण त्यातील माती पावसाळ्यात संपूर्ण रस्त्यावर आली व यात वाहने अडकून बसली. तसेच काही काळ वाहतूकही बंद करावी लागली. माणगाव खोऱ्यात हत्तीपकड मोहीम राबविली गेली. यात प्रशिक्षण दिलेल्या हत्तीद्वारे रानटी हत्तींना पकडावयाचे होते. ती देखिल यशस्वी झाली होती. ही मोहीम तिलारी खोऱ्यात राबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र ही मागणी अंमलात आणली न गेल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. त्यानंतर वनविभागाने जंगलात मिरची पावडरयुक्त दोरखंड लावले. मधुमक्षिका पेट्या बसविल्या. मात्र हे सर्व प्रयोग निष्फळ असल्याचे हत्तींनी दाखवून दिले. त्यामुळे वनविभाग आता कोणती उपाययोजना राबविणार व हत्तींना हुसकावून लावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हत्तींना हुसकावून लावणे अशक्य 

तिलारी खोऱ्यातील हत्तींना हुसकावून लावणे हे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. बाबरवाडी येथे फटाके फोडून हत्तींना हुसकावताना हत्तींनीच ग्रामस्थांवर प्रतिहल्ला केला होता. यात काही ग्रामस्थ जखमी झाले होते. शिवाय हेवाळेतही अशीच परिस्थिती उद्भवली होती. गतवर्षी मोर्लेत एका शेतकऱ्यावर हत्तीने हल्ला चढवून त्याला सोंडेत उचलून आपटले होते. यंदा दाखल झालेल्या पाच हत्तींच्या कळपात एक लहान पिल्लू व दोन त्यापेक्षा साधारण मोठ्या पिल्लांचा समावेश आहे. या हत्तींना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास पिल्लांच्या संरक्षणार्थ मोठे हत्ती प्रतिहल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या हत्तींना रोखणे वनविभागालाही डोईजड जाणार का ? याबाबत चर्चा सुरू आहे.

घरालगत हत्तींचा वावर

कोकणात घराजवळच माड, केळी, फणस, आंबा यांची झाडे लावतात. माड, फणस, केळी हे हत्तींचे आवडते खाद्य असल्याचे बोलले जाते. सुरूवातीला हत्ती हे लोकवस्तीपासून दूरवरच राहत. मात्र अलीकडच्या काही वर्षांत या हत्तींनी लोकवस्तीत पाय रोवले. घराजवळ असलेले माड जमीनदोस्त करत फणस खाण्यासाठी थेट अंगणात येत आहेत. घराजवळ हत्तींचा वावर वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. भीतीपोटी सायंकाळ नंतर घरातून बाहेर पडणेही ग्रामस्थांनी टाळले आहे.

हत्ती कॅमेऱ्यात कैद

केर गावापासून ५०० मीटर अंतरावर रानटी हत्ती देवतळीत स्नान करत आहेत. तुषार देसाई यांनी एका संस्थेमार्फत त्या परिसरात कॅमेरे लावले होते. यात हत्ती तळीत स्नान करून पुढे जात आहेत. तर त्याच परिसरातील काजू बागायतीत बिनधास्त फिरताना मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. हत्तींचा त्रास थेट लोक वस्ती पर्यंत पोहोचला असून वनविभागाच्या सर्व उपाययोजना तकलादू ठरल्या आहेत.

योग्या पावले उचलण्याची गरज

हत्तींचा त्रास गेल्या वीस वर्षांपासून तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांना होत आहे. आतापर्यंत अनेक उपाययोजना वनविभागाने आखल्या, पण त्याचा तसूभरही हत्तींवर परिणाम झाला नाही. उलट हत्तींचा वावर अधिकच वाढू लागला आहे. हत्ती पकड मोहीम राबविताना पर्यावरणप्रेमी यांनी देखील सहकार्य केले पाहिजे, त्यातच शेतकऱ्यांच्या भावना सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजेत. वनविभागाने तिलारी वनक्षेत्रात हत्तींसाठी आवश्यक असणाऱ्या खाद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. हत्ती प्रश्नी गंभीर पावले उचलली पाहिजेत. स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत.
– प्रेमानंद देसाई, माजी सरपंच-केर

ॲक्शन प्लॅनची गरज
मधुमक्षिका पेट्या हत्तींना घालविण्यासाठी एका संस्थेमार्फत लावण्यात आल्या, पण हा प्रयोग अयशस्वी ठरला‌. संस्थेने उपलब्ध करून दिलेले कॅमेरे केर मधील तुषार देसाई यांनी लावले होते. यात हत्ती अगदी पेट्यांच्या जवळून मार्गक्रमण करीत असून अशा मधुमक्षिकामुळे त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. वनरक्षक हे फक्त रात्रीच्या वेळी येतात आणि बॅटरीच्या साहाय्याने हत्ती परिसरात फिरतात. तेव्हा अशा तकलादू उपाययोजनांमुळे हत्तींवर काहीही परिणाम होणार नाही. यापुढे वनविभागाला हत्ती प्रश्न योग्य असा ॲक्शन प्लॅन राबवून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला पाहिजे.
– तुषार देसाई, ग्रामस्थ, केर

 

 

Back to top button