सिंधुदुर्ग : आंबे चोरल्याच्या संशयातून मारहाण; सात जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

सिंधुदुर्ग : आंबे चोरल्याच्या संशयातून मारहाण; सात जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

वेंगुर्ले : पुढारी वृत्तसेवा
वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा-वरचेमाडवाडी येथे आंबा चोरी केल्याच्या संशयावरून वेंगुर्ले-कलानगर डचवखार नजीक राहणारा गौतम वेंगुर्लेकर याला मारहाण केल्याप्रकरणी 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना 9 मे रोजी रात्री 11 ते 11.30 वा.च्या सुमारास घडली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून आलेल्या सूचनांनुसार या घटनेचा तपास करीत 12 मे रोजी संबंधित व्यक्‍ती गौतम कैलास वेंगुर्लेकर याची फिर्याद पोलिसांनी नोंदवून घेतली.

उभादांडा-वरचेमाडवाडी येथे 9 मे रोजी रात्री आंबा चोरी केल्याच्या संशयावरून एका व्यक्‍तीस मारहाण केलीव या मारहाणीचा व्हिडिओ करून तो व्हायरल केला. तो जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यापर्यंत गेल्याने याप्रकरणी वेंगुर्ले पोलिसांना चौकशी करून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार वेंगुर्ले पोलिसांनी तपास करीत गौतम वेंगुर्लेकर याची तक्रार 12 मे रोजी घेतली. या तक्रारीत कोणतेही कारण नसताना आपणास मारहाण करीत मारहाणीचा व्हिडिओ काढला, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केला, त्याचबरोबर जातीवाचक बोलून अपमान केल्याचे नमूद आहे.

या तक्रारीत संशयित म्हणून प्रसाद मांजरेकर, प्रतिक धावडे, रावशा शेलार, गौरव मराठे, नयन केरकर, दिनेश गवळी, योगी सरमळकर या सात संशयितांची नावे नमूद आहेत. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी संशयित सातही जणांवर गौतम वेंगुर्लेकर याच्या तक्रारीनुसार अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील सातही संशयित फरार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास विभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंखे करीत आहेत.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news