रत्नागिरी : पत्नीचा दगडाने ठेचून खून करणार्‍या पतीला जन्मठेप

रत्नागिरी : पत्नीचा दगडाने ठेचून खून करणार्‍या पतीला जन्मठेप

खेड (रत्नागिरी) : पुढारी वृत्तसेवा
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या पत्नीच्या मागोमाग जात तिच्या डोक्यात काठीने प्रहार करून तिचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी प्रदीप काशिराम खोचरे (रा. निळीक, ता. खेड) याला खेड येथील अतिरिक्‍त सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. खेडच्या अतिरिक्‍त सत्र न्यायालय-1 चे न्यायाधीश ए. एस. आवटे यांनी ही शिक्षा ठोठावली आहे.

खेड तालुक्यातील मौजे निळीक येथे दि. 16 जून 2015 रोजी प्रदीप काशिराम खोचरे याने त्याची पत्नी सुवर्णा हिच्यावर संशय घेत सकाळी सुवर्णा खोचरे या प्रातःविधीसाठी गेल्या असता त्यांच्या पाठोपाठ जाऊन तिच्या डोक्यावर काठीने मारले. तसेच दगडाने ठेचून तिचा खून केला होता. याप्रकरणी आरोपीत प्रदीप याला खेडमधील अतिरिक्‍त सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला.

याप्रकरणी सरकारी वकील सौ. मृणाल जाडकर यांनी सरकारी पक्षाच्या वतीने युक्‍तिवाद केला. या प्रकरणात एकूण 17 साक्षीदार
तपासण्यात आले. तसेच परिस्थितीजन्य पुरावा मांडण्यात आला. या गुन्ह्याचे तापसिक अंमलदार तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक जांभळे, प्रभारी अधिकारी खेड पोलिस निरीक्षक निशा जाधव, कोर्ट पैरवी अजय इदाते, श्री. मर्चंड यांनी या कामात सरकारी वकिलांना सहकार्य केले. या खटल्यात न्यायालयाने प्रदीप याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news