दापोली : आमदार योगेश कदम समर्थकांचे शक्ती प्रदर्शन, घोषणा दिल्याने वातावरण तापले | पुढारी

दापोली : आमदार योगेश कदम समर्थकांचे शक्ती प्रदर्शन, घोषणा दिल्याने वातावरण तापले

दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली नगरात बांधण्यात आलेल्या शिवपुतळ्याचे अनावरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे हस्ते होणार आहे. या सोहळ्याआधीच दापोलीत योगेश कदम समर्थक यांच्याकडून ‘योगेश दादा आगे बडो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे पुतळा अनावरणाच्या आधीच दापोलीत वातावरण तापले आहे. दि. २९ रोजी रात्री देखील शिवपुतळा येथे नावाच्या पाटीवरून तू-तू मैं-मैं झाली होती. त्यामुळे दापोलीत रात्रीपासून वातावरण तापले आहे.

दि. ३० रोजी सकाळपासूनच आमदार योगेश कदम समर्थक यांनी अनावरण ठिकाणी गर्दी केली होती. यावेळी समर्थकांच्या हातात आमदार योगेश कदम आणि आदित्य ठाकरे यांचे बॅनर होते. यावेळी घोषणाबाजी सुरू होती. दरम्यान, पोलीस आणि समर्थक यांच्यात देखील वादावादी झाली. त्यामुळे दापोलीत याचे राजकीय पडसाद उमटले.

शिवपुतळा अनावरण हे दापोली नगर पंचायतीच्या माध्यमातून होत आहे. मात्र या प्रक्रियेतून योगेश कदम यांना डावलले, असा आरोप योगेश कदम समर्थक करत आहेत. सभेच्या ठिकाणी योगेश कदम आणि आदित्य ठाकरे यांचे छोटे बॅनर लावण्यात आले आहेत. या सर्व घटनेबाबत आदित्य ठाकरे नेमके काय बोलतील याकडे दापोलीवासियांचे लक्ष लागले आहे. शिवपुतळा अनावरण या ठिकाणी योगेश कदम आणि दळवी समर्थक असे चित्र दापोलीकरांना दिसले. सकाळपासूनच योगेश कदम यांच्या नावाने आगे बडो अशा घोषणा सुरू होत्या.

Back to top button