जळगाव : भरवस्तीतील घरफोडी ; लाखोंच्या दागिन्यासह रोकड लंपास | पुढारी

जळगाव : भरवस्तीतील घरफोडी ; लाखोंच्या दागिन्यासह रोकड लंपास

जळगाव पुढारी वृत्तसेवा ; शहरातील भरवस्तीतील व रेल्वेच्या हद्दीजवळ असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या नवीपेठ परिसरातील घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला असून ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी अंदाजे १५ ते २० लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

शहरातील नवीपेठ परिसरात असलेल्या पत्र्या हनुमान मंदिर समोर बॉम्बे लॉजच्या गल्लीत राजू गोविंद अग्रवाल वय-५२ हे परिवारासह राहतात. मोबाईल रिपेअरिंग करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. दि. २४ मार्च रोजी ते दुपारी पुणे येथे मुलगा अखिल अग्रवाल याच्याकडे गेले होते. तत्पूर्वी त्यांची बहीण सुरेखा नंदू भावसार या दुबई येथे मुलाकडे जाणार असल्याने त्यांनी सोन्याचे दागिने राजू अग्रवाल यांच्या घरी ठेवले होते. घराला कुलूप असल्याने चोरट्यांनी रेल्वेच्या बाजूने येत लोखंडी खिडकीचे गज वाकवून काचेची खिडकी फोडत घरात प्रवेश केला. कपाट फोडत चोरट्यांनी मंगळसूत्र, नेकलेस, मोतीहार, बारा कानातले, सोन्याचे तुकडे, २ अंगठी, ३ सोन्याचे शिक्के, चैन असा जवळपास २५ ते ३० तोळे दागिने आणि देव्हाऱ्यात ठेवलेले ८ हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला.

बुधवारी अग्रवाल कुटुंबीय घरी आले असता घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड, उपनिरीक्षक जगदीश मोरे, सर्जेराव क्षीरसागर, कर्मचारी योगेश बोरसे, योगेश पाटील, रतन गिते, तेजस मराठे, प्रणेश ठाकूर, अक्रम शेख, संजय हिवरकर, मोरे यांच्यासह एलसीबीचे विजयसिंग पाटील, राजेश मेढे, अविनाश देवरे आदी पोहचले आहेत.

हेही वाचा :

Back to top button