दोडामार्ग : घाटीवडे राज्यमार्गावर हत्तींचा वावर; नागरिक धास्तावले | पुढारी

दोडामार्ग : घाटीवडे राज्यमार्गावर हत्तींचा वावर; नागरिक धास्तावले

दोडामार्ग, पुढारी वृत्तसेवा : घाटीवडे येथे राज्यमार्गावर दोन हत्ती व तीन पिल्ले आढळून आली. सोमवारी रात्री उशिरा घरी परतत असताना संदेश राणे यांना हे हत्ती  (elephant) दिसून आले. काही दिवसांपूर्वीच दोन हत्ती व तीन पिल्ले वीजघर, घाटीवडे, तेरवण-मेढे, सोनावल, मोर्ले या परिसरात दाखल झाली आहेत. शेतकऱ्यांचे हत्तींनी अतोनात नुकसान केले आहे. या परिसरातील ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी बाहेर पडणेही मुश्कील बनले आहे. त्यामुळे हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

हत्तींच्या (elephant) वास्तव्यामुळे तिलारी ते वीजघर असा रात्रीच्या प्रवास करणेही धोकादायक असल्याचे ग्रामस्थ व वाहनधारकांनामधून बोलले जात आहे. घाटीवडे येथील रहिवासी व युवासेनेचे कार्यकर्ते संदेश राणे हे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम आटोपून सोमवारी रात्री उशिरा घरी परतत होते.

रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास घाटीवडे येथे पोहोचताच त्यांच्या गाडीसमोर दोन हत्ती व तीन पिल्ले असल्याचे त्यांनी स्पष्टपणे पाहिले. व त्यांचा भितीने थरकाप उडाला. मात्र, हे हत्ती रस्त्याने थेट सरळ चालत जात होते. यावेळी संदेश राणे व त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी काही काळ हत्ती जंगलात जाण्याची प्रतीक्षा केली. काही वेळाने हत्ती जंगलात निघून गेल्याने संदेश राणे यांनी गाडी मार्गस्थ केली.

वीजघर परिसरात दाखल झालेल्या हत्तींच्या कळपात एक अतिशय लहान पिल्लू आहे. हत्ती हा पिल्लाच्या संरक्षणासाठी कोणावरही चाल करून शकतो. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने गांभीर्य लक्षात घेऊन या हत्तींचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होऊ लागली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button