Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यासाठी सिंधू-रत्न योजनेतून ७५० कोटी : अजित पवार | पुढारी

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यासाठी सिंधू-रत्न योजनेतून ७५० कोटी : अजित पवार

रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा : सिंधू-रत्न योजनेतून यापूर्वी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यना तीन वर्षासाठी प्रत्येकी ३०० कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात पाच आमदार असल्याने रत्नागिरी जिल्ह्याला या योजनेतून ७५० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. सोमवारी दि २८ रोजी खेड येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

सोमवारी दि २८ रोजी राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार खेड दौऱ्यावर आले होते. त्यांनी शहरातील वैश्य भवन सभागृहात कार्यकर्त्यासोबत संवाद साधला. यावेळी प्रास्ताविक बाबाजी जाधव यांनी सादर केले. माजी आमदार संजय कदम, खा. सुनिल तटकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी अजित पवार म्हणाले, कोरोनामुळे दोन वर्षे बिकट परिस्थितीत गेली असली तरी राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पंचसूत्री अर्थसंकल्प करण्यात आला आहे. कोकण गेली चार वर्षे नैसर्गिक आपत्तीस तोंड देत आहे. कोरोना सोबतच कोकण जिद्दीने या आपत्तींना सामोरा गेला. त्यामुळे राज्य सरकार कोकणात विशेष लक्ष देत आहे.

जागतिक परिस्थिती पाहता आजही कोरोनाचे संकट पूर्ण दूर झालंय अस म्हणता येणार नाही. सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. जागतिक पातळीवरील युद्ध परिस्थिती मुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढून महागाई वाढत आहे. मात्र त्या परिस्थितीत देखील राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला घरगुती वापराच्या गॅसची दरवाढ सोसावी लागू नये म्हणून तीन टक्के कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अन्य भागांच्या तुलनेने कोकण असा एकमेव भाग आहे जिथे वीजबिल थकबाकी नगण्य आहे. कोकणाला आवश्यक सर्व बाबी देण्याचा हे सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.

राज्यात सन १९९० नंतर आलेल्या सरकारांमध्ये त्यातल्या एकाही पक्षाला बहुमत नव्हतं. राज्याची राजकीय परिस्थिती अशी बनली आहे की ज्यामध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमताने सरकार स्थापन करता येत नाही. ही परिस्थिती आता सर्वांनीच स्वीकारणे गरजेचे आहे. गेल्या निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ही परिस्थिती ओळखून आघाडीचा निर्णय घेतला. त्यामुळे आघाडीतील तीन पक्षात ज्या ठिकाणी स्पर्धा आहे तिथे कार्यकर्त्यांची अडचण झाली हे मी समजू शकतो. मात्र त्या अडचणीतून मार्ग काढत पुढे जावे लागेल. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. मात्र राज्य पातळीवर झालेल्या निर्णयाचा देखील आदर प्रत्येकाने राखला पाहिजे.

आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकांच्या बाबतीत स्थानिक जिल्हा पातळीवर आघाडी बाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील. मात्र आघाडी करताना अथवा स्वतंत्र लढताना भाजपाला लाभ होणार नाही याचा विचार करणे आवश्यक असणार आहे, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय बिरवटकर यांनी केले.

 हेही वाचा

Back to top button