

भोसरी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाकाळात खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाच्यावतीने जलतरण तलाव बंद करण्यात आले होते.
सध्या कोरोनाचे सावट ओसरल्याने दैनंदिन जीवन पूर्वपदावर येत असल्यामुळे प्रशासनाने जलतरण तलाव पूर्ण क्षमतेने सुरू करावेत, अशी मागणी जलतरणपटू करीत आहेत.
पालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत भोसरी परिसरातील चालविण्यात येणारे जलतरण तलाव बंद आहेत. क्रीडा विभागाच्यावतीने शहरात विविध ठिकाणी तेरा जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, हे जलतरण तलाव अद्यापही सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
तेरा तलावांपैकी सध्याचा स्थिततीला पिंपळे गुरव येथील तलाव सुरू आहे. इतर तलावांची देखभाल दुरुस्तीची कामे आहेत. सुमारे दोन वर्षांपासून तलाव बंद असल्याने तलावातील फरशा निखळल्या आहेत.
अनेक ठिकाणी विद्युतविषयक कामे, मोटार दुरुस्ती, फिल्ट्रेशन प्लँट दुरुस्ती कामे सुरू असल्याची माहिती क्रीडा विभागाच्यावतीने देण्यात आली.
अनेक जलतरणपटू नियमित सरावासाठी येतात. पासधारक, ज्येष्ठ नागरिक, बच्चे कंपनी, खेळाडू नियमितपणे तलावावर पोहोण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी येत असतात. परंतु, जलतरण तलाव बंद असल्याने सर्वांचा हिरमोड होत आहे.
शहरातील सर्व जलतरण तलावांची डागडुजी सुरू करण्यात आली आहे. दोन वर्षांपासून जलतरण तलाव बंद असल्याने या समस्या उद्भवल्या आहेत. भोसरी, मोहननगर, थेरगाव, चिंचवड व सांगवी येथील जलतरण तलावाची खोली कमी करण्याचे काम सुरू आहे. महिन्याभरात सर्व तलाव सुरु करण्यात येतील
– सुषमा शिंदे,सहायक आयुक्त, क्रीडा विभाग
भोसरी येथील जलतरण तलावाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. तलावाची खोली साडेसात फुटांपर्यंत करणे, विद्युतविषयक कामे, फिल्ट्रेशन प्लँट, फरशा, दरवाजे नव्याने बसविण्यात येणार आहेत. यासाठी 3
कोटी 21 लाख रुपयांची निविदा आहे.
– देवान्ना गट्टूवार,कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग
कोरोनाकाळात सर्वांना व्यायामाचे महत्व पटले आहे. नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता प्रशासनाने शहरातील सर्व जलतरण तलाव सुरू केले पाहिजेत.
– सुनील ननावरे,जलतरणपटू प्रशिक्षक
क्रीडा विभागाच्या मागणीनुसार भोसरी जलतरण तलावातील विद्युतविषयक कामे करण्यात आली आहेत. येथील सर्व लाईट्स सुरू करण्यात आल्या आहेत.
– प्रकाश कातोरे,कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग