ना. प्रवीण दरेकर : एकदा काय शंभर वेळा अटक करा | पुढारी

ना. प्रवीण दरेकर : एकदा काय शंभर वेळा अटक करा

सातारा : पुढारी वृत्तसेवा
मी राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. राज्यातील उत्तम असणार्‍या चार ते पाच बँकांपैकी असलेली मुंबै बँक याला जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे. मी राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून जनतेपुढे तुमचे खरे चित्र आणतो आहे. यामुळे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करुन मला अटक करण्याचा सरकारचा विचार आहे. परंतु असल्या गोष्टींना मी घाबरत नाही एकदा काय 100 वेळा अटक करा आणि आता अधिवेशनामध्ये सर्व गोष्टींचा आम्ही पर्दाफाश करणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते ना. प्रवीण दरेकर यांनी सातार्‍यात पत्रकार परिषदेत दिला.

ते म्हणाले, मुंबै बँक, ठेवीदार व सहकार विभागाची मजूर असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी वकीलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. मी सरकार विरोधात आवाज उठवत असल्याने मुंबई जिल्हा बँकेचे खोटे प्रकरण राज्य सरकारने पुढे आणले आहे. आम्ही कोणताच गुन्हा केला नाही. आता सहकार मंत्र्यांच्या परिसरातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील सहकारामध्ये सुरु असलेला भ्रष्टाचार उकरून काढण्यासाठी आम्ही गुप्तहेर बनलो आहोत.

ना. दरेकर म्हणाले, राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत, त्यांचे कर्ज माफ करायला सरकारकडे पैसे नसल्याचे सांगितले जाते. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारच्या या धोरणाविरोधात आवाज उठवत असल्याने मुंबई जिल्हा बँकेतील कर्ज प्रकरणावरून मला टार्गेट केले जात आहे. जिल्हा बँकेने भाजपच्या कार्यकर्त्यांनाच केवळ कर्ज दिले नाही, तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही कर्ज दिलेले आहे. माहिती अधिकारामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील बँकांची माहिती मागवली आहे. ती दिली जात नाही, सहकारातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे वास्तव परिस्थिती मांडणार आहे, असेही दरेकर म्हणाले.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश सहकारी संस्था, जिल्हा बँका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात आहेत. अनेकांना बोगस सभासदत्व देऊन खोटी कर्जे वाटप केलेले आहेत, यातलं बरंचसं आमच्या हाताला लागलेलं आहे. आम्ही रोजगार हमी योजनेत काम करून मोठे झालो आहोत. कष्टानं मोठं होऊ पाहणार्‍यांना, नेत्यांना राष्ट्रवादीचे नेते टार्गेट करत आहेत, ते किती धुतल्या तांदळासारखे आहेत, हे लवकरच कळेल असे ना. दरेकर म्हणाले.

Back to top button