‘एकीआम’ ब्रँडच्या माध्यमातून हापूस जगभरात! | पुढारी

‘एकीआम’ ब्रँडच्या माध्यमातून हापूस जगभरात!

देवगड : पुढारी वृत्तसेवा
देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेमार्फत यावर्षीपासून इनोटेरा या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सहकार्याने ‘एकीआम’ या ब्रँडच्या माध्यमातून जीआय नोंदणीकृत हापूस आंब्याला देशात व परदेशातही चांगला दर व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे यांनी दिली.

देवगड तालुका आंबा उत्पादक संस्था कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत अ‍ॅड.अजित गोगटे व इनोटेरा कंपनीचे प्रमुख अधिकारी मुकेश खंडेलवाल बोलत होते. अ‍ॅड.अजित गोगटे म्हणाले, देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेमार्फत यावर्षीपासून इनोटेरा या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सहकार्याने आंबा मार्केटींग करण्याचे ठरविले आहे. गेली 15 वर्षे ही कंपनी अ‍ॅग्रीकल्चर, फ्रुटमध्ये काम करत असून यावर्षी प्रथम आंबा मार्केटींगमध्ये काम करणार आहे. आंब्याचे मार्केटींग विशेषतः ज्या आंब्याचे जीआय नोंदणी झालेली आहे त्यांना चांगला दर मिळावा व देशात-परदेशात आंबा जावा या हेतूने कंपनीने सहकार्य करण्याचे ठरविले आहे.

यासाठी फार्मास्ट प्रोड्युसर कंपनी नोंदणी करण्यात येणार असून जीआय खाली नोंदणी संस्थांना ही नोंदणी करण्याचा अधिकार आहे. यासाठी इनोटेरा कंपनीने आंतरराष्ट्रीय मार्केट विचारात घेवून ‘एकीआम’ हा ब्रँड बनविला आहे. या ब्रॅडच्या माध्यमातून मार्केटींग करणार आहे. बागायतदार ते थेट ग्राहक अशा संकल्पनेतून जगभरातील बाजारपेठेमध्ये हापूस आंबा पोहोचावला जाणार आहे. देवगड तालुक्यात देवगड आंबा उत्पादक संस्थेमार्फत आंबा खरेदी करण्यात येणार आहे. या आंब्याला बारकोड लावण्यात येणार असून तो आंबा कुठल्या बागेतील, कोणाचा हे समजणार आहे. हा आंबा मुंबईत स्कॅनिंग होणार असून यानंतर विक्रीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचणार आहे. यामुळे ग्राहकाला उत्तम दर्जाचा आंबा खायला मिळणार आहे. यामध्ये देवगड हापूस आंबा हा अन्य आंब्यांपेक्षाही कसा चांगला आहे हे सप्रमाण दाखविता येणार आहे.

देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेमार्फत 10 कलेक्शन सेंटर उभारण्यात येणार आहेत. यामध्ये जामसंडे, तळेबाजार, शिरगांव, पडेल, गिर्ये, पाटगांव, मोंड बापर्डे, हिंदळे, किंजवडे व इळये याशिवाय कात्रादेवी येथे आंबा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
या सेंटरमधून आंब्याचे ग्रेडींग होवून, पॅकींग होवून मुंबईला कंपनीच्या सेंटरला रवाना होणार आहे अशी माहिती अ‍ॅड.गोगटे यांनी दिली.
देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.दत्तात्रय बलवान, कंपनीचे दीपक बन्सल, प्रकल्प अधिकारी नीलम कर्नाटकी, श्री. विजयसिंह व संस्थेचे व्यवस्थापक संतोष पाटकर उपस्थित होते.

Back to top button