रशियाकडून युक्रेनवर सर्व बाजूंनी चौफेर हल्ले सुरुच; आज सकाळपर्यंत काय काय घडलं ? | पुढारी

रशियाकडून युक्रेनवर सर्व बाजूंनी चौफेर हल्ले सुरुच; आज सकाळपर्यंत काय काय घडलं ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनने शरणागती पत्करण्यास नकार दिल्यानंतर रशियानेही सर्व बाजूंनी चौफेर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनीयन फौजांकडून राजधानी कीवमध्ये कडाडून प्रतिकार सुरुच आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा घनघोर संघर्ष सुरुच आहे. देशांच्या चारी बाजूंनी रशियन फौजांनी वेढा दिला आहे. दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी एल्गार पुकारला असून देशातील जनतेला आपली भूमी वाचवण्यासाठी निकराची लढाई लढण्याचे आवाहन केले आहे.

आज सकाळी कीवमध्ये दोन मोठे स्फोट झाले यामध्ये एका तेलाच्या टँकरला आग लागली. कीव शहराच्या दक्षिणेकडे हे स्फोट झाले. ज्या परिसरात हे स्फोट घडून आले त्या ठिकाणी युक्रेन मोठे लष्करी तळ आणि तेलाचे अनेक टँकर्स आहेत. सीएनएन या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

स्विफ्टमधून रशियन बँकाना निलंबित

अमेरिका, युरोपियन कमिशन, फ्रान्स, जर्मनी, इटली, युनायटेड किंगडम आणि कॅनडा यांनी अनेक रशियन बँकांना स्विफ्टमधून निलंबित केले आहे. SWIFT हे असे नेटवर्क आहे ज्या माध्यमातून बँका पैसे ट्रान्सफर इतर देवाणघेवाण करण्यासाठी सुरक्षित संदेश पाठवला जातो. जवळपास २०० देशातील ११ हजार वित्तीय संस्था SWIFT प्रणालीचा वापर करतात. international financial transfer system चा SWIFT हा मुख्य कणा आहे.

Russian National SWIFT Association नुसार रशिया या प्रणालीचा वापर करण्यात अमेरिकेनंतर दुसऱ्या कमांकावर आहे. या प्रणालीशी ३०० रशियन वित्तीय संस्था जोडल्या गेल्या आहेत. रशियामधील अर्ध्याहून अधिक वित्तीय संस्था SWIFT च्या सदस्य आहेत.
रशियाकडून कडाडून हल्ले

रशियाकडून युक्रेनवर कडाडून हल्ले सुरु आहेत. युक्रेनने सुद्धा कडवा प्रतिकार केल्याने रशियन फौजांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये रशियाला मोठ्या हानीला सामोरे जावे लागत आहे.

रशियाला सोशल मीडियातून दणका

रशियन मीडियांना सोशल मीडियातून दणका देण्यात आला आहे. त्यांना सोशल मीडियातून कोणत्याही प्रकारचा पैसा कमावता नाही. फेसबुकने याबाबत घोषणा केली आहे. युट्यूबनेही रशियन माध्यमांना दणका देत आरटी ब्लॉक केलं आहे.

झेलेन्स्की यांच्याकडून आवाहन

युक्रेन राष्ट्राध्यक्ष व्लोदीमीर झेलेन्स्की यांनी त्यांच्या जनतेला रशियन आव्हान मोडीत काढण्यासाठी आवाहन केले आहे. जे युक्रेनियन परदेशात राहत आहेत त्यांना आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी परत येण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी जगभरातील स्वयंसेवकांचे स्वागत असल्याचे म्हटले आहे. जे येतील त्यांना लढण्यासाठी बंदूक देऊ असे त्यांनी म्हटले आहे.

निर्वासितांचे तांडे

एकीकडे असंख्य युक्रेनियन युद्धाच्या भीतीने देश सोडून पळाले असून, ही संख्या दोन दिवसांत दीड लाखांवर पोहोचली आहे. निर्वासितांचे हे तांडे खासकरून पोलंड आणि मोल्डोवामध्ये पोहोचले. बाहेर देशात वास्तव्याला असलेले अनेक युक्रेनियन मात्र कीव्हमध्ये केवळ देशासाठी लढण्याकरता परतल्याचेही चित्र आहे. जवळपास साडे आठ लाख जणांना युद्धाचा फटका बसला आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास ४० लाख युक्रेनियन देशातून परागंदा होऊ शकतात असे चित्र आहे. अनेक देशांच्या सीमेवर मोठी रांग लागू शकते अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button