नाशिक मनपाला घरपट्टीच्या दंडातून 42 कोटींचे उत्पन्न | पुढारी

नाशिक मनपाला घरपट्टीच्या दंडातून 42 कोटींचे उत्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपाच्या कर विभागाने गेल्या तीन महिन्यांत नव्याने 15 हजार मिळकती कराच्या टप्प्यात आणल्या असून, मिळकत सर्वेक्षणात आढळून आलेल्या 59 हजार मिळकतींपैकी 36 हजार 68 मिळकतींना घरपट्टी लागू करण्यात आली आहे. या मिळकतींना केलेल्या दंडाच्या माध्यमातून महापालिकेला 42 कोटींची कमाई झाली आहे. महापालिकेच्या मिळकतींची संख्या आता पाच लाखांपर्यंत पोहोचली आहे.

मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण केले होते. त्यात 59 हजार मिळकती आढळून आल्या होत्या. विविध कर विभागाने मिळकतींची फेरतपासणी केली असता, 59 हजार मिळकतींपैकी 22 हजार मिळकती या अधिकृत, तर 37 हजार मिळकती या अनधिकृत असल्याचे समोर आले होते.
महापालिकेच्या नोटिसीनंतर या 37 हजार मिळकतधारकांनी सुनावणीला हजर राहात हरकती नोंदविल्या. गेडाम यांच्यानंतर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या मिळकतींवर पूर्वलक्षी प्रभावाने दंडात्मक कर लावल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

कर विभागाने मिळकतधारकांच्या हरकतींवर सुनावणी पूर्ण केल्यानंतर 1 एप्रिल 2018 पासून नवीन करयोग्य मूल्य दरानुसार घरपट्टी आकारणीचा निर्णय घेतला. तसेच मिळकतधारकांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे मिळकतींची घरपट्टी आकारणी निश्चित करण्याचा निर्णय मनपाने घेतला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे हे काम थांबले होते. परंतु, एप्रिल 2021 पासून विविध कर विभागाने या मिळकतींना घरपट्टी लागू करण्याची मोहीम सुरू केली.

पहिल्या टप्प्यात या 37 हजारांपैकी 22 हजार मिळकतधारकांची सुनावणी पूर्ण होऊन त्यांना एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत घरपट्टी लागू केली. घरपट्टी लागू करण्याचे काम संथगतीने केल्याबद्दल मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी डिसेंबर 2021 मध्ये संबंधित लिपिकांना नोटिसा बजावल्याने कर विभागातील संबंधित लिपिकांनी उर्वरित मिळकतींना घरपट्टी लागू केली. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत आणखी 15 हजार 68 मिळकतींना घरपट्टी लागू झाली आहे.

हेही वाचा ;

Back to top button