नगराध्यक्षपदाचे आरक्षण : जिल्ह्यात तीन ठिकाणी ‘महिला राज’ | पुढारी

नगराध्यक्षपदाचे आरक्षण : जिल्ह्यात तीन ठिकाणी ‘महिला राज’

कणकवली : पुढारी वृत्तसेवा; अलिकडेच पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी मुंबईत काढण्यात आली. यामध्ये कुडाळ, देवगड, वैभववाडी या तीन नगरपंचायतींमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी तर दोडामार्गात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले. यामुळे तीन ठिकाणी महिलांना संधी मिळाली आहे तर अनेकांचा पत्ता कट झाला आहे. दोडामार्गात सर्वसाधारण प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आहे. आता त्या त्या नगरपंचायतीतील सत्ता बळानुसार कोणाला संधी मिळते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

दोडामार्ग आणि वैभववाडीमध्ये भाजपने निर्विवादपणे बहुमत मिळवत सत्ता मिळवली आहे. तर देवगडमध्ये भाजपची सत्ता उलथवून त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीने सत्तेचा सोपान गाठला आहे. कुडाळमध्ये मात्र, त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. कुडाळात भाजप 8, शिवसेना 7 आणि काँग्रेस 2 अशा जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी काँग्रेसची भूमिका आता महत्त्वाची असून सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडेच आहेत. येथे शिवसेनेबरोबरच भाजपनेही आपला नगराध्यक्ष बसणार असल्याचा दावा केला आहे.

त्यामुळे कुडाळच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीकडे सार्‍यांचेच लक्ष आहे. कुडाळमध्ये जरी त्रिशंकू स्थिती असली तरी राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने काँग्रेस निश्‍चितपणे शिवसेनेबरोबर असेल, अशी ग्वाही काँग्रेसचे नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येत या ठिकाणी सत्ता स्थापन करतील अशी शक्यता आहे. अर्थात भाजपही या ठिकाणी सत्तेसाठी जोरदार प्रयत्न करणार हेही तितकेच खरे आहे.

वैभववाडीमध्ये भाजपच्या 10 विजयी नगरसेवकांपैकी 6 महिला नगरसेविका आहेत. त्यामुळे साहजिकच या सहापैकी एकीला संधी मिळणार आहे. देवगडमध्ये शिवसेनेचे 8 आणि राष्ट्रवादीचे 1 असे 9 नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादीची 1 महिला नगरसेविका विजयी झाल्या आहेत. मात्र या ठिकाणी शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने साहजिकच याठिकाणी शिवसेनेची महिला नगराध्यक्ष बसणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

कुडाळमध्ये भाजपच्या 8 नगरसेवकांपैकी 4 महिला, शिवसेनेच्या 7 नगरसेवकांपैकी 4 तर काँग्रेसच्या दोन्हीही महिला नगरसेवक आहेत. त्यामुळे यामधूनच एकीची निवड नगराध्यक्षपदासाठी होणार आहे. येथे सत्तेचे समीकरण कसे असेल यावरूनच ते अवलंबून असेल. दोडामार्गमध्ये भाजपच्या 13 नगरसेवकांपैकी 7 महिला नगरसेविका आहेत तर एक अपक्ष आहे. त्यामुळे यातूनच एकीची निवड नगराध्यक्षपदासाठी होणार आहे.

राज्यात खुल्या प्रवर्गासाठी 109 जागा, अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 पदे राखीव

मुंबई : राज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण गुरुवारी जाहीर झाले असून खुल्या प्रवर्गासाठी 109, अनुसूचित जातीसाठी 17 तर अनुसूचित जमातीसाठी 13 पदे राखीव झाली आहेत. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी अध्यक्षपदाच्या 17 जागा आरक्षित झाल्या असून त्यातील 9 जागा या अनुसूचित जाती (महिला) तर 8 जागा या अनुसूचित जाती (सर्वसाधारण) साठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button