बेळगाव : मनपावर महिला राज; ‘नगरविकास’ कडून आरक्षण जाहीर, नगरसेवकांचा अपेक्षाभंग | पुढारी

बेळगाव : मनपावर महिला राज; ‘नगरविकास’ कडून आरक्षण जाहीर, नगरसेवकांचा अपेक्षाभंग

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा :  महापालिका निवडणूक झाल्यानंतर साडेचार महिन्यांनी महापौर आणि उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यानुसार महापौरपद सामान्य वर्ग महिला आणि उपमहापौरपद इतर मागास ब वर्ग महिलेसाठी राखीव असणार आहे. त्यामुळे महापालिकेवर महिलाराज येणार असून महापौरपदाची अपेक्षा बाळगलेल्या पुरुष नगरसेवकांची निराशा झाली आहे.

महानगरपालिकेची निवडणूक होऊन साडेचार महिने उलटले; मात्र अद्याप महापौर, उपमहापौरपदाची निवड झालेली नाही. त्यामुळे नाराजीचा सूर उमटत असताना आरक्षणाची घोषणा नगरविकास खात्याकडून करण्यात आली आहे. यापूर्वी महापौरपदासाठी ‘सामान्य पुरुष’ आणि उपमहापौरपदासाठी ‘सामान्य महिला’ असे आरक्षण एक वर्षभरापूर्वी जाहीर झाले होते. मात्र त्यानंतर मनपाची निवडणूक झाली.

तसेच, 3 सप्टेंबरला मतदान झाले, तर 6 सप्टेंबरला निकाल लागला. त्यानंतर लगेच महापौर-उपमहापौर निवडणूक होणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. कारण, मार्च 2019 ला सभागृहाचे विसर्जन झाले. मात्र 2019-20 साठी दोन्ही पदांचे आरक्षण आधीच जाहीर झाले. होते. त्याशिवाय 2020-21 आणि 2021-22 या वर्षांसाठीही या दोन्ही पदांचे आरक्षण निवडणुकीच्या आधीच जाहीर झाले होेते. त्यानुसार महापौरपद खुले आणि उपमहापौरपद महिलेसाठी राखीव होते; मात्र सप्टेंबरमध्ये निवडणूक झाल्यानंतर या तीनपैकी कोणते आरक्षण ग्राह्य मानायचे, याबाबत नगर प्रशासन खात्यामध्ये गोंधळ होता. खरे तर 2021-22 चे आरक्षण ग्राह्य मानून गेल्या सप्टेंबरमध्येच नव्या महापौराची निवड होणे गरजेचे होते. पण, ती झाली नाही. शिवाय निवडून आलेल्या नगरसेवकांचा शपथविधीही झालेला नाही. पान 7 वर

दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल

महापालिका निवडणूक होऊन साडेचार महिने उलटले तरी महापौर, उपमहापौर निवडणूक झाली नसल्यामुळे ही मतदारांची थट्टाच असल्याचे विशेष वृत्त दै. ‘पुढारी’ने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारी रोजी छापले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रशासक एम. जी. हिरेमठ यांनी महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्याकडून माहिती मागवून घेतली. त्यानंतर महापौर, उपमहापौर निवडणुकीबाबत हालचाली झाल्या. याशिवाय काही दिवसांपूर्वी आमदार सतीश जारकीहोळी यांनीही महापौर, उपमहापौर निवडणुकीबाबत बोचरी टीका केली होती.

कोण होणार महापौर, उपमहापौर?

महापौरपद सामान्य महिला गटासाठी असल्याने 29 महिलांपैकी कोणीही महापौर होऊ शकते. उपमहापौरपदासाठी तीन नगरसेविका पात्र आहेत. त्यामध्ये प्रभाग 31च्या नगरसेविका वीणा विजापुरे (भाजप), प्रभाग 3 च्या ज्योती कडोलकर (काँग्रेस) आणि प्रभाग 10 च्या नगरसेविका वैशाली भातकांडे (म. ए. समिती) पात्र आहेत. पैकी भाजपचे बहुमत असल्याने वीणा विजापुरे उपमहापौर बनू शकतात. भाजपमधून त्या एकमेव पात्र आहेत.

महापौर, उपमहापौरपदाचे नव्याने आरक्षण जाहीर झाले आहे. नगरविकास खात्याने आरक्षण जाहीर केले असून लवकरच निवडणूक प्रक्रिया होईल, अशी अपेक्षा आहे?

हे ही वाचलं का 

Back to top button