सिन्नर येथे कुरापत काढून 11 जणांकडून शेतकर्‍यास तलवारीने मारहाण | पुढारी

सिन्नर येथे कुरापत काढून 11 जणांकडून शेतकर्‍यास तलवारीने मारहाण

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा : शेतातील शेवर्‍या का तोडल्या, या कारणावरुन कुरापत काढून 11 जणांनी शेतकर्‍यास तलवारीने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कणकोरी शिवारात रविवारी (दि. 23) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुकदेव विठोबा सांगळे (58, रा. कणकोरी) यांनी वावी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सुकदेव सांगळे व संशयीत आरोपी प्रभाकर सुकदेव सांगळे (रा. कणकोरी) व इतर दहाजण संशयीत आरोपी नात्याने वडील, मुले व इतर नातेवाईक व त्यांचे जोडीदार लागत असून रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास प्रभाकर सांगळेसह एकजण हे सुकदेव सांगळे यांच्या कणकोरी शिवारात राहत्या घरासमोर आले. शेतातील शेवर्‍या का तोडल्या, म्हणत सुकदेव सांगळे यांच्या अंगावर खुर्ची घेऊन धावले व तलवारीने त्यांच्या खांद्यावर, तसेच डाव्या हाताच्या मनगटाच्या पुढे बोटावर वार करून जखमी केले. त्यादरम्यान सुकदेव सांगळे यांचा मुलगा गोविंद व पांडू सानप यांनी खुर्ची पकडली.

झटापटीत गोविंद याच्या हाताला, पायाला मार लागला. त्यानंतर प्रभाकर सुकदेव सांगळेसह इतर तेथून निघून गेले. पुन्हा दुपारी 2.30 च्या सुमारास सुकदेव सांगळे सासरच्या 9 नातेवाईकांना घेऊन हातात लोखंडी रॉड घेऊन आले. सुकदेव सांगळे यांना धमकी देत हातातील दगड, काठीने मारहाण करून घरावर दगडफेक केली. घराची भिंत, पत्रे तोडून धान्याच्या गोण्यांचेही नुकसान केले. या घटनेत सुकदेव सांगळे जखमी झाल्याने ते नाशिक येथील सिव्हील हॉस्पीटलध्ये उपचार घेत आहेत. पोलिसांंनी जबाब घेतल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

हे ही वाचा :

Back to top button