dapoli crime : दापोलीतील तिहेरी हत्याकांडाचे आरोपी अटकेत, स्वत:हुन दिली गुन्हाची कबुली | पुढारी

dapoli crime : दापोलीतील तिहेरी हत्याकांडाचे आरोपी अटकेत, स्वत:हुन दिली गुन्हाची कबुली

दापोली ; पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यातील वणौशी येथील वयोवृध्द महिलांच्या तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यास रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. आर्थिक कारणावरुन गुन्ह्याचे अमानुष कृत्य केल्याची आरोपीकडून कबुली देण्यात आली आहे. सात दिवसानंतर या घटनेतील आरोपी पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. (Dapoli Crime)

मकर संक्रांतीच्या दिवशी दापोली तालुक्यातील मौजे वणौशी तर्फे नातू, खोतवाडी येथे एकाच घरात रहाणाऱ्या तीन वयोवृध्द महिलांचा अज्ञाताकडून डोक्यात घाव घालून अर्धवट जाळून ठार मारले होते.

सोन्याचे दागिने व घरातील पैसे चोरीस गेल्याची अत्यंत क्रूर घटना घडलेली होती. घटनेनंतर दापोली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार देण्यात आली होती.

dapoli crime : काय आहे नेमके प्रकरण ?

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनोशी खोतवाडीत तीन वयोवृध्द महिलांची हत्या करण्यात आली होती. पार्वती परबत पाटणे, सत्यवती परबत पाटणे व इंदूबाई शांताराम पाटणे अशी या संशयास्पद मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. हा खून की आकस्मिक मृत्यू याबाबत चर्चेला उधाण आले होते.

मात्र, पोलिसांनी हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. तीन महिलांचा खून झाल्याची रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून या घटनेने जिल्हा हादरून गेला होता.

परबत पाटणे यांच्या घरात वेगवेगळ्या खोलीत या तीन महिलांचे मृतदेह आढळून आले. यामध्ये इंदूबाई पाटणे यांचा मृतदेह हॉलमध्ये, सत्यवती यांचा बेडरूममध्ये तर पार्वती यांचा मृतदेह किचनमध्ये पडला होता. तिघींच्या डोक्यात वार झाले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.

गुन्हयाचे घटनास्थळ हे कमी लोकवस्तीचे ग्रामीण भागातील असल्याने तसेच आरोपीने घटनास्थळी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. यामुळे गुन्हयाचा उलगडा होण्याकरीता जिल्हयातील अधिकारी व अंमलदार यांचे अपर पोलीस अधीक्षक, यांनी ५ पथके तयार केली व त्यांना घटनास्थळाचे निरीक्षणापासून आरोपीचा शोध घेण्यापर्यंत वेगवेगळी कामे नेमून दिली होती.

Back to top button