

Jyoti Waghmare Slams Ganesh Naik: महापालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरही महायुतीतील राजकीय वातावरण तापलं आहे. नवी मुंबईतील निवडणुकांदरम्यान गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष रंगला होता. आता तोच वाद पुन्हा उफाळून आला असून, गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करत “भाजपाने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवू” अशा आशयाचं विधान केलं होतं. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच, ज्योती वाघमारे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट इशारा दिला आहे.
ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईक यांना “औकातीत राहा” असा दम दिला आहे. त्या म्हणाल्या की, एकनाथ शिंदेंबाबत बोलताना गणेश नाईक यांनी आपली मर्यादा ओळखून बोलावं. इथून पुढे शिंदेंविषयी चुकीचा एकही शब्द निघाला, तर “उरल्या-सुरल्या इभ्रतीचे धिंडवडे काढले जातील, पिसाळलेल्या कुत्र्याला म्युनिसिपालिटीच्या गाडीत टाकून त्याचा बंदोबस्त कसा करायचा, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'लाडक्या बहिणींना' चांगलचं ठाऊक आहे.'' अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला.
वाघमारे यांनी असंही म्हटलं की, दुसऱ्यांचं “नामोनिशाण” पुसण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांनी स्वतःचं राजकीय आणि नैतिक वजन तपासावं. “ज्यांच्यावर बलात्कार आणि विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत.” असं म्हणत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
ज्योती वाघमारे यांच्या आक्रमक प्रतिक्रियेनंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळाच रंग आला आहे. एकेकाळी निवडणुकीपुरता मर्यादित असलेला वाद आता आणखी वाढताना दिसत आहे. या प्रकरणामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव आणखी वाढणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महापालिका निवडणुकीआधी नवी मुंबईत जागावाटपावरून जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर महायुतीत मतभेद झाले. निकालानंतर हे प्रकरण शांत होईल असं वाटत असतानाच, गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंवर टीका करत वातावरण तापवलं. त्यानंतर शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंनी सडकून टीका केली.