

Ganesh Naik on Eknath Shinde
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील शाब्दिक संघर्षांला पूर्णविराम मिळाला असल्याच्या चर्चा असताना पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे.बालेकिल्ले कोणाचेही नसतात जर पक्षाने आता जरी परवानगी दिली तर यांचे नामोनिशान मिटवून टाकेन, असा थेट इशाराच एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात येऊन गणेश नाईक यांनी दिला आहे. मात्र हे आपले वैयक्तिक मत असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले आहे. गणेश नाईक यांच्या या वक्तव्यामुळे पालिका निवडणूका संपल्या असतील तरी राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
भाजपचे ठाणे अध्यक्ष संदीप लेले यांच्या पाचपाखाडी परिसरातील माघी गणेशोत्सवाला आज (दि.२५) वनमंत्री गणेश नाईक यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट केले आहे. ते म्हणाले,आम्हाला युती नकोच होती. मात्र युती झाल्यानंतर,नवी मुंबईतही वाटाघाटी करताना १११ पैकी ५७ जागा शिवसेनेने मागून मोठे भाऊ होण्याचा प्रयत्न केला. मात्र अवघ्या २० ते २२ जागांवर त्यांना थांबवून नवी मुंबईत मी भाजपची एकहाती सत्ता आणली. ठाण्यात मात्र भाजपच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले असून, भाजपचे कार्यकर्ते नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.
मी यापूर्वीही म्हणालो होतो, पालिका निवडणूक ही कार्यकर्त्याची असते, एकदा त्यांना लढू द्या, जास्त संख्या त्यांचा महापौर, हे मी मत मांडलं, काही ठिकाणी ही संधी मिळाली,काही ठिकाणी मिळाली नाही, नवी मुंबईमध्ये मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा शिवसेनेची सत्ता आली, मी राष्ट्रावादी मध्ये गेलो तेव्हा २० वर्ष राष्ट्रवादीची सत्ता आली. २५ वर्ष ज्या पक्षात गेलो त्यांची सत्ता आली.यापूर्वी ठाणे,मीरा भाईंदर, उल्हासनगर,या ठिकाणी महापौर बसवले आहेत, त्यामुळे बालेकिल्ले हे कोणाचेही नसतात. भाजपने आता जरी परवानगी दिली तर यांचे नामोनिशान मिटवून टाकेन,असा इशाराच गणेश नाईक यांनी ठाण्यात येऊन दिला. मात्र हे आपला वैयक्तीक मत असल्याचे देखील नाईक सांगायला विसरले नाहीत.
जी करामत मी नवी मुंबईत केली ती करामत ठाण्यातील लोकांना करामत करता आली नाही. ठाण्यातील भाजपच्या लोकांच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले. ठाणे, कल्याण, उल्हासनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची परवड झाली. तरीही कार्यकर्त्यांनी शिस्त पाळली. युती होऊ नये हे माझं खाजगी मत होत. जर या निवडणुकीत भाजपला एकटे सोडले असते,तर ठाण्यात भाजपचे एकट्याचे सभागृह असते, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.