जालना : परतूरजवळ श्रीष्टी येथे एसटी पुराच्या पाण्यात कोसळली | पुढारी

जालना : परतूरजवळ श्रीष्टी येथे एसटी पुराच्या पाण्यात कोसळली

जालना; पुढारी वृत्तसेवा : एसटी पुराच्या पाण्यात कोसळली : जालना जिल्ह्यात परतूर-आष्टी मार्गावरील कसुरा नदीला आलेल्या पुरात एसटी बस उलटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेत कोणीही जखमी वा मृत नसल्याची प्राथमिक माहिती आहे. परतूर आगाराची परतूर-आष्टी ही बस (क्रमांक एमएच 14, बीटी 2280) नदीवर बांधलेल्या पुलावरून जात असतानाच ती पुराच्या पाण्यात उलटली.

पुलाच्या शेवटच्या भागात चालकाला पाण्याचा अंदाज आला नाही, खड्यामुळे बस एका बाजुने उलटली. पाणी पातळी चार फुटच असल्याने मोठी दुर्घटना टळली. या बसमध्ये सोळा प्रवासी होते. ते सर्वजण बाहेर पडले.

या घटनेची माहिती कळताच परिसरातील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मदतकार्याला प्रारंभ केला. एसटी महामंडळाचे अधिकारी, पोलिस अधिकारी तातडीने मदतीसाठी धावले.

पुलावरून पाणी जात असल्याने दोन्ही बाजूंकडील वाहतूक दुपारी थांबविण्यात आली होती. दरम्यान, या पुलावर दुपारी तीन वाजता एक दुचाकीस्वार पाण्यात वाहून गेला होता. पूर असतानाही त्याने पाण्यात दुचाकी घातली, परंतु मोटारसायकल सोडून तो पोहत बाहेर आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

हे ही वाचलं का?

Back to top button