जालना जिल्ह्याचे नियोजन अंधारात

जालना जिल्ह्याचे नियोजन अंधारात
Published on
Updated on

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा नियोजनच्या बैठकीत वीज गूल झाल्याने पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासह आमदारांना अंधारातच जिल्ह्याचे नियोजन करावे लागले. जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत जिल्ह्यासाठी 2022-23 या वित्तीय वर्षाकरिता 358 कोटी 29 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर निधीच्या खर्चाचे काटोकोर नियोजन करुन प्रत्येक विभागाने त्यांना दिलेला निधी वर्षभरात विविध विकास कामांवर वेळेत खर्च होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, माजी आमदार चंद्रकांत दानवे, अरविंद चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी आदींसह समिती सदस्य व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत वित्तीय वर्ष 2021-22 मध्ये जिल्ह्याच्या विकास कामांसाठी 336 कोटी 21 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. प्राप्त झालेल्या निधीपैकी जवळपास 98.17 टक्के निधी विविध विकास कामांवर खर्च करण्यात आल्याने त्याबाबत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त करत चालू वर्षातही मंजूर असलेला निधी पूर्णपणे खर्च करण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना केल्या.

बैठकीत आ. बबनराव लोणीकर यांनी महावितरणसह पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना धारेवर धरले. बैठक सुरु असतानाच सभागृहाची वीज गायब झाल्याने मोबाईलच्या उजेडात बैठक घेण्यात आली. जालना तालुक्यातील पिंपळवाडी, सोनदेव, पाष्टा, एरंडवडगाव, सेवली, खांबेवाडी, नागापूर, पाथरूड , उखळी, शिवनगर, दरेगाव, कोळवाडी, वरखेड आदी गावांमध्ये मागील वीस ते बावीस दिवसांपासून अंधार असल्याने लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना जाब विचारला.

माझ्या मतदारसंघावर अन्याय : आ. कुचे

बदनापूर विधानसभा मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी राखीव असल्यामुळे माझ्या मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. उपअभियंता किंवा शाखा अभियंता दर्जाचे अधिकारी माझ्या मतदारसंघातील विविध विभागांमध्ये नाहीत. त्यामुळे विविधअडचणींचा सामना करावा लागत आहे. माझ्या मतदारसंघातील 20 ते 22 गावे मागील दोन महिन्यांपासून अंधारात आहेत. वारंवार प्रशासनाला फोनद्वारे कळवून देखील प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही, अशी खंत बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त केली.

मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर…

जालना शहराचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण पालकमंत्री असताना 129 कोटी रुपये जालना पालिकेला दिले होते. पाणीपुरवठ्याचे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असतानाही आठ वर्षे होऊनही जलकुंभ व पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण न झाल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाण्यासाठी आक्रोश मोर्चा काढावा लागतो. ही बाब अत्यंत संतापजनक असल्याचे सांगत लोणीकर यांनी मुख्याधिकार्‍यांना धारेवर धरले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news