

CM Fadnavis Emotional Tribute Ajit Pawar: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत भावनिक वातावरण पाहायला मिळालं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकप्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.
विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले, “दादांच्या पोटात एक ओठात एक असं कधी झालं नाही. जे मनात, तेच ओठांवर असा त्यांचा स्वभाव होता. रात्री उशिरापर्यंत सभागृह चाललं तरी ते आपल्या जागी बसलेले दिसायचे. आज ते आपल्यात नाहीत, ही गोष्ट मनाला चटका लावणारी आहे.”
मुख्यमंत्री म्हणाले की, यावर्षी दादांनी बारावा अर्थसंकल्प मांडला असता, पुढच्या वर्षी तेरावा अर्थसंकल्प सादर करून त्यांनी एक ऐतिहासिक विक्रमही केला असता. पण नियतीने वेगळंच ठरवलं. आज जो अर्थसंकल्प मांडायची जबाबदारी माझ्यावर आली आहे, ती दादांची जागा भरून निघणारी नाही.
फडणवीस यांनी दादांच्या कामाची शिस्त, सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणारे काम आणि कठोर निर्णय घेण्याची तयारी यांचं विशेष कौतुक केलं. ‘लाडकी बहीण’ योजनेचा निर्णय असो वा मोठ्या आर्थिक सुधारणा, दादा नेहमी ठाम उभे राहायचे, असं त्यांनी नमूद केलं. “कठोर निर्णय घ्यायचे असतील, तर मागे-पुढे न पाहणारा नेता म्हणजे अजित दादा,” असं म्हणत त्यांनी जुन्या आठवणी जागवल्या.
अजित दादांसारखा सच्चा मित्र गमावणं ही केवळ राजकीय हानी नाही, तर वैयक्तिक पातळीवर खोल वेदना देणारी घटना आहे, असं ते म्हणाले. दोघांच्या नात्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, 2014 नंतर त्यांच्यात भावनिक जवळीक निर्माण झाली. राजकारणात आम्ही भागीदार होतो, पण मनापासून मित्रही होतो. शेवटच्या दिवसापर्यंत आमचं नातं तसंच राहिलं, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
सभागृहात बोलताना त्यांनी 2019 चा एक प्रसंगही सांगितला. मुख्यमंत्री म्हणाले, ''अजित दादांबद्दल सगळे नेहमीच सांगतात की शब्दाला जागणारा अशा प्रकारचा नेता होता. त्याचा अनुभव 2019 ला आम्ही घेतला. 2019 ला ज्यावेळी आमचं ठरलं की सरकार तयार करायचं. त्यानंतर काही कारणाने तो निर्णय त्यावेळी वरिष्ठांनी बदलला. पण दादांनी त्यावेळेस भूमिका घेतली की, नाही मी शब्द दिलेला आहे, मी शब्द मोडणार नाही आणि आम्ही सरकार तयार केलं.''
''शपथविधी घेतला, त्याला अनेक लोकांनी पहाटेचा शपथविधी म्हटलं. त्याला पहाटेचा म्हटलं की, दादा त्याच्यावर नाराज व्हायचे. दादा म्हणायचे, पहाट म्हणजे सहा वाजता पहाट नाही. आम्ही नऊ वाजता शपथ घेतली होती. तो सकाळचा शपथविधी आहे, असं नेहमी ते पत्रकारांना सांगायचे.''
''मला आजही आठवतं की त्यावेळी त्यांना त्याची किंमत मोजावी लागली पण तरी देखील त्यांनी सांगितलं की, एकदा निर्णय झाला होता. मग या निर्णयाला मी बांधील असेल आणि ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला. त्यावेळी वर्षा बंगल्यावर दादा आणि मी दोघचं होतो. त्यावेळी तो निर्णय विरोधात गेल्यानंतर त्या ठिकाणी सरकार स्थापन करणं काही शक्य नव्हतं. दादांनी विचारलं काय केलं पाहिजे? मी म्हटलं दादा आता याच्यामध्ये उगीच तुम्ही स्वतःचा बळी द्यावा अशी आमची पण अपेक्षा नाही. ठीक आहे आता जे काही असेल तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि त्यानंतर माझ्याशी चर्चा करून दादांनी तो निर्णय घेतला.''
त्या काळात कठीण राजकीय परिस्थितीतही दादा ठामपणे उभे राहिले होते आणि राज्याच्या विकासासाठी निर्णय घेत होते. अशा नेत्याच्या अचानक जाण्याने मोठी पोकळी निर्माण होते, असं सांगताना संपूर्ण सभागृह गंभीर झालं.