बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : डिसेंबर अखेरपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी शिफारस राज्य शासनाने निवडणूक आयोगाकडे केली होती. असे असतानाही निवडणूक आयोगाने बेळगाव (Belgaum) महापालिकेची निवडणूक जाहीर केली आहे, अशी माहिती पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री गोविंद कारजोळ यांनी आज (दि.१५) पत्रकारांना दिली. यावेळी त्यांनी बेळगाव (Belgaum) महापालिकेला नवा आयुक्त देण्यात येतील, अशी घोषणाही केली.
ध्वज वंदन कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी दोनशेहून अधिक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असताना पुन्हा निवडणुका जाहीर कशी करण्यात आली, असा सवाल पत्रकारांनी केला.
या वेळी कारजोळ म्हणाले की, डिसेंबरपर्यंत कोणत्याही निवडणुका नको, अशी शासनाने शिफारस निवडणूक आयोगाकडे केली होती मात्र त्यांनी स्वतःहून महापालिकेची निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे याला सामोरे जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही.
महापालिकेच्या आयुक्त जगदीश के. एच. हे आ. अभय पाटील यांनी त्यांच्या घरासमोर कचरा टाकल्यामुळे दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले आहेत, असा सवाल करताच कारजोळ यांनी याबाबत कोणतीही मत देण्यास नकार दिला.
महापालिकेला लवकरच नवा आयुक्त देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला सध्या पोषक वातावरण असून भाजप सत्तेवर येईल, असा दावाही त्यांनी केला. जिल्ह्यांमध्ये आणखी मंत्रिपदे देण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्याच्या आहे. याबाबत त्यांना विचारा, असेही ते म्हणाले.
हेही वाचलं का?