Omicron Maharashtra : परदेशातून महाराष्ट्रात आलेल्या १०९ जणांचा फोन बंद, घरांना कुलूप | पुढारी

Omicron Maharashtra : परदेशातून महाराष्ट्रात आलेल्या १०९ जणांचा फोन बंद, घरांना कुलूप

ठाणे : पुढारी ऑनलाईन : Omicron Maharashtra : ओमायक्रॉन या कोरोना व्हेरियंटचा मुंबई आणि उपनगरामध्ये शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पालिका (KDMC) प्रमुख विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली आहे की ठाणे जिल्ह्यातील या महापालिका क्षेत्रात नुकतेच २९५ लोक परदेशातून परतले आहेत. ज्यांचा सध्या १०९ जणांचा शोध लागला नाही. यातील काही लोकांचे मोबाईल बंद येत आहेत, तर अनेकांनी दिलेले पत्त्यांवर चौकशी केली तर त्यांच्या घरांना कुलूप असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

ज्या देशांमध्ये ओमायक्रॉनचा धोका मोठ्या प्रमाणात आहे त्या देशांमधून आलेल्या व्यक्तींना सात दिवस होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा नियम केला आहे. या दरम्यान त्यांची कोविड चाचणी केली जात असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले.

Omicron Maharashtra : ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यांनाही सात दिवस अलगीकरणात

ते पुढे म्हणाले, ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आला तरी त्याला पुन्हा सात दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. तसेच नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे ही गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांची जबाबदारी आहे. विवाह, मेळावे इत्यादींचे उल्लंघन होऊ नये यासाठी लक्ष ठेवले जात असल्याचेही ते म्हणाले.

KDMC मधील सुमारे ७२ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर ५२ टक्के लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. नुकताच डोंबिवलीतील एकाला ओमायक्रॉनचा संसर्ग आढळून आला.

KDMC आरोग्य विभाग सतर्क

गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेले रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला असून त्या रुग्णांसोबत ज्या ४२ जणांनी प्रवास केला आहे त्या प्रवाशांची यादी सरकारकडे पाठवण्यात आली आहे. कोणाला कोरोनाची बाधा झाली आहे का याचा शोध घेतला जाणार आहे.

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांच्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालाबाबत आरोग्य विभागाला अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याचं पालिकेच्या साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉक्टर प्रतिभा पाटील यांनी सांगितले आहे.

Back to top button