तीनसदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब | पुढारी

तीनसदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेवरून निर्माण झालेला गोंधळ अखेर संपुष्टात आला. या निवडणुका तीनसदस्यीय प्रभाग रचना करूनच होणार असून मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले.

मंत्रिमंडळ बैठकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अन्य काँग्रेस मंत्र्यांनी तीनऐवजी दोनसदस्यीय प्रभाग रचनेचा आग्रह धरला. मात्र, तो अमान्य करण्यात आला.

गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत महापालिका निवडणुकांसाठी तीन, तर नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांसाठी दोनसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयावर काँग्रेसची नाराजी जाहीर झाली.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत तीनसदस्यीय प्रभाग रचना रद्द करून ती दोनसदस्यीय करावी, असा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक भूमिका घेणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर काँग्रेसचा विरोध मावळला. मागील निवडणुकीत भाजप सत्तेत असल्यामुळे मोठी प्रभागरचना फायदेशीर ठरली. यावेळी तशी शक्यता नाही. मोठी प्रभागरचना ही महाविकास आघाडीसाठी सोयीची ठरेल, असेही काँग्रेसला पटवून देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचा विरोध मावळला.

प्रभागरचनेवर महाविकास आघाडीत आधीच चर्चा झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीतही सुमारे अडीच तास यावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली असता, बैठकीत मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे. त्यावर तीनसदस्यीय प्रभागरचना अंतिम करण्यात आली आहे. आता फेरबदल करणे चुकीचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांना सांगितले.

उद्धव यांनी काँग्रेसला काय सांगितले?

ही प्रभागरचना महाविकास आघाडीला कशी फायद्याची आहे. तीनसदस्यीय प्रभाग रचनेमुळे आघाडीत होणारी संभाव्य बंडखोरी टळेल. अन्यथा आपले बंडखोर भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता अधिक आहे.

ज्या ठिकाणी आघाडी होईल त्या ठिकाणी जागावाटप करणे तीन सदस्यीय प्रभागामुळे सोपे जाईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेत्यांची समजूत काढल्याचे समजते.

Back to top button