हृदयविकाराचा आजाराने तरुणांत मृत्यूचे प्रमाण चिंताजनक! | पुढारी

हृदयविकाराचा आजाराने तरुणांत मृत्यूचे प्रमाण चिंताजनक!

कोल्हापूर : राजेंद्र जोशी

जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्या तरी नव्या महासत्तेची स्वप्ने पाहणार्‍या देशातील तरुणाईला बदलती जीवनशैली, वाढता तणाव, आहार व व्यायाम यांच्या बिघडलेल्या संतुलनाने पोखरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे देशात लहान वयात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडणार्‍या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या नव्या आव्हानाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी पुन्हा एकदा पारंपरिक अस्सल भारतीय जीवनशैली अंगीकारण्याची गरज तर निर्माण झाली आहेच; शिवाय मोठ्या संख्येने तरुणांचे मृत्यू रोखण्यासाठी शासन स्तरावरही उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे. जगभरात 29 सप्टेंबर हा जागतिक हृदयदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना दै. ‘पुढारी’शी बोलत होते.

देशभरात तरुणांपुढे निर्माण झालेले हे आव्हान अतिशय गंभीर असल्याचे नमूद करताना त्यांनी कोल्हापुरात सप्टेंबर महिन्यात तिशीच्या उंबरठ्यावरील तीन तरुणांना आलेल्या आकस्मिक हृदयविकाराच्या झटक्याची उदाहरणे समोर ठेवली होती. हे तीनही रुग्ण छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. सुदैवाने योग्य वेळी उपचारापर्यंत पोहोचल्याने त्यांचे जीवन वाचविता येणे शक्य झाले. पण त्यांच्या एकूण आरोग्याचा अभ्यास करता अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचे तरुणाईतील वाढते प्रमाण मात्र अधोरेखित करून गेले. संबंधित तरुण उपचारापर्यंत वेळेत पोहोचले म्हणून त्यांना वाचविता येणे शक्य झाले असले तरी आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडलेल्या आणि रुग्णालयाच्या उंबर्‍यावर येणार्‍या तरुणांची संंख्याही काही कमी नाही. जगभरात अशाप्रकारे मृत्युमुखी पडणार्‍या तरुणांचे प्रमाण 10.3 टक्क्यांवर गेले आहे आणि भारतात तर 50 वयोगटापेक्षा खालील वयोगटातील अचानक हृदयविकाराचा झटका येऊन उपचाराची कोणतीही संधी न देता मृत्युमुखी पडणार्‍या तरुणांचे प्रमाण 21 टक्क्यांवर आहे. यामुळेच पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये हृदयविकाराने मृत्युमुखी पडणार्‍या रुग्णांचे सरासरी 62 वर्षे असलेले वय आजभारतात 47 वर्षावर येऊन ठेपले आहे. याची दखल सर्वच पातळ्यांवर घेण्याची गरज आहे. अन्यथा सर्वाधिक तरुणांच्या भारतात तरुणांच्या आरोग्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

भारतामध्ये तरुणाईला या हृदयविकाराने एवढे का चिकटावे, याचा जगभरात सखोल अभ्यास होतो आहे. यामध्ये अनुवंशिक कारणही दडले आहे. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी या ख्यातनाम संस्थेमध्ये केलेल्या संशोधनामध्ये भारतातील नागरिकांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या मुख्य वाहिनीचे सरासरी आकारमान कमी असल्याचे निदर्शनास आले. हा आकार 2.25 ते 2.75 मि.मी. दरम्यान असतो. तर तेच आकारमान पाश्चिमात्य राष्ट्रातील नागरिकांमध्ये सरासरी 3.5 ते 4.5 मि.मी. इतके आढळते. रक्तवाहिन्यांच्या कमी आकारमानाला भारतात बदलत्या जीवनशैलीने बळावत चाललेला मधुमेह रक्तवाहिन्यामध्ये अनावश्यक चरबी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. ही चरबी रक्ताची गुठळी निर्माण करण्यास आणि आकस्मिक हृदयाच्या झटक्यास कारणीभूत ठरते. अशी चरबी निर्माण करण्यासाठी चंगळवादी पदार्थांचे सेवन जसे सहाय्यभूत ठरते तसे उद्दिष्टांवर आधारित कार्यप्रणालीतील मानसिक ताणतणाव शरीरातील रक्तदाब वाढविण्यास हातभार लावतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम आज तरुणांतील वाढत्या हृदयविकाराच्या झटक्याने जाणवतो आहे याकडे डॉ. अक्षय बाफना यांनी लक्ष वेधले.

सिने क्षेत्रातील सक्षम अभिनेता म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू हा याच प्रवर्गातील होता. तिशीतील या अभिनेत्याला बघता बघता मृत्यूच्या जबड्यात घेतले. अशा तरुणाईवर आलेले हे संकट कोणतीही पूर्वसूचना न देता येते हा सर्वात गंभीर मुद्दा आहे. यामुळे तरुणांनीही आज आपल्या आरोग्याची नित्य तपासणी करून घेणे गरजेचे बनले आहे. दररोज 40 मिनिटांचा व्यायाम जसा महत्त्वाचा आहे तसे व्यायामशाळेतील अतिरिक्त व्यायाम आणि संप्रेरकयुक्त (स्टेरॉईड) प्रथिनांचे सेवनही टाळण्याची गरज आहे. याखेरीज पॅकबंद खाद्यपदार्थांनाही आता रामराम ठोकण्याची सवय लावली तरच निरोगी जीवन जगता येऊ शकते, असे डॉ. बाफना यावेळी म्हणाले.

देशातील तरुणाईपुढे निर्माण झालेले हे आव्हान रोखण्यासाठी नागरिकांनी व्यक्तिगत पातळीवर घ्यावयाच्या खबरदारीबरोबर शासन स्तरावर काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्याची गरज आहे, असे स्पष्ट करताना डॉ. बाफना यांनी हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदयक्रिया चालू करण्यासाठी तातडीने हृदयाला शॉक देण्याची यंत्रणा जोखमीच्या हालचाली (हायरिस्क अ‍ॅक्टिव्हिटी) सुरू असलेल्या प्रत्येक ठिकाणी बसविण्याची गरज प्रतिपादित केली. सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीपर्यंत ही यंत्रणा विकसित केली तर मृत्यू रोखता येतील याकडे लक्ष वेधताना त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मृत्यूचे उदाहरण दिले. डॉ. कलाम यांना हृदयविकार होता. पण केवळ शॉक देणारी यंत्रणा वेळेत उपलब्ध न झाल्याने या महान शास्त्रज्ञाचे प्राण वाचविता येणे शक्य झाले नाही, असे ते म्हणाले.

भारतात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला तातडीने उपचारापर्यंत पोहोचविण्यापर्यंतही पुरेशी जागरूकता नाही. ‘क्रिएट रजिस्ट्री’ या संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये भारतात हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला उपचारापर्यंत पोहोचण्यासाठी सरासरी 1803 मिनिटे लागतात, असे या संस्थेचे निरीक्षण आहे. पाश्चिमात्य राष्ट्रात हा कालावधी अवघ्या सरासरी 110 ते 140 मिनिटांचा आहे. याखेरीज पाश्चिमात्य राष्ट्रात असे रुग्ण रुग्णवाहिकेतून रुग्णालयापर्यंत नेण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर असताना भारतात मात्र अवघे 5.4 टक्के रुग्ण रुग्णवाहिकेला पसंती देतात. यावरूनच उपचाराच्या सुविधेत किती कमतरता आहे आणि आपल्याला किती मजल मारावयाची आहे याची कल्पना येऊ शकते.

शासन स्तरावरही उपाययोजनांच्या उपलब्धतेचे आव्हान कायम!

  • आकस्मिक हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी डॉ. बाफना यांचा सल्ला
  1. नियमित आरोग्याची तपासणी,
  2. दररोज 40 मिनिटांचा व्यायाम,
  3. संतुलित आहाराचे सेवन,
  4. व्यायामशाळेतील अतिरिक्त व्यायामाला सुटी,
  5. पॅकबंद अन्नपदार्थांचे सेवन टाळा,
  6. दिवसाला 6 ते 7 तासांची झोप हवी,
  7. दारू, सिगारेट, तंबाखू व्यसनांपासून दूर राहा.

Back to top button