पुणे : आखाड्यासाठी दोनशे मल्ल सहभागी | पुढारी

पुणे : आखाड्यासाठी दोनशे मल्ल सहभागी

महाळुंगे पडवळ, पुढारी वृत्तसेवा : बैलपोळा यात्रोत्सवानिमित्त महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे भरवण्यात आलेल्या कुस्ती आखाड्यात सुमारे 200 हून अधिक नामवंत मल्लांनी सहभाग घेतला.

विजेत्यांना एक लाख रुपयांहून अधिक रकमेची बक्षिसे, चांदीची गदा देण्यात आली. महिलांनी लक्षवेधी कुस्त्या करून प्रेक्षकांची मने जिंकली. या वेळी सुमारे 5 हजार कृस्तीप्रेमी उपस्थित होते. या आखाड्यात नगर, औरंगाबाद, शिर्डी, संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, ठाणे, छत्तीसगडमधील मल्ल सहभागी झाले होते.

देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद व माजी आमदार (कै.) अण्णासाहेब आवटे यांच्या पुतळ्याला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, सचिन भोर, अविनाश रहाणे, राजाराम बाणखेले, सरपंच सुजाता चासकर, डॉ. दत्ता चासकर उपस्थित होते.

मयूर नायकोडी, भूषण बारवे, गोवर्धन शिंदे, सोन्या मुसळे, आदित्य रायकर, सोमनाथ पवार आदी पहिलवानांच्या कुस्त्या लक्षवेधक ठरल्या. तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष (कै.) किसन सैद पाटील यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेली दोन किलो चांदीची गदा राजू चतर या पहिलवानाने जिंकली. पंच म्हणून डॉ. विठ्ठल चासकर, मानिक सैद, रमेश पडवळ, नामदेव पडवळ, विश्वास सैद यांनी काम पाहिले.

Back to top button